विधान परिषदेसाठी इच्छुकांची जोरदार लाँबिंग ! कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळणार ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । येत्या जुलै महिन्यात विधान परिषदेतील १० आमदारांची मुदत संपत असून,या निवडणुकांची लवकरच घोषणा होण्याची शक्यता असल्याने भाजप,शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून इच्छुक असणाऱ्यांनी आतापासूनच लाँबिंगला सुरुवात केली आहे.१० जागांसाठी प्रत्येक पक्षातून इच्छुकांची संख्या मोठी असल्याने प्रत्येक पक्षांतील नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर,सदाभाऊ खोत,सुजितसिंह ठाकूर,विनायक मेटे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, दिवाकर रावते,प्रसाद लाड,रविंद्र फाटक, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, संजय दौंड या आमदारांचा कार्यकाल येत्या जुलै महिन्यात संपत आहे. कार्यकाळ संपत असलेल्या या आमदारांपैकी कोणाला पुन्हा संधी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले असले तरी विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी आतापासूनच लाँबिंगला सुरुवात केली आहे.विधानपरिषदेच्या एका सदस्य निवडीसाठी २७ मतांची गरज असते.विजयाच्या सुरक्षित मतांसाठी हा आकडा २९ मतांचा कोटा देण्यात येतो. सध्याचे बलाबल पाहता भाजपचे ४, शिवसेनेचे २ राष्ट्रवादी काँग्रेसचे २ आणि काँग्रेसचा एका जागेवर विजय होवू शकतो.एका जागेसाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चुरस होवू शकते.

शिवसेनेकडून ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांना पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता आहे.तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासाठी माघार घेणार सचिन अहिर यांना शिवसेना संधी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधान परिषदेवर जाण्यासाठी मिलिंद नार्वेकर हे इच्छूक आहेत.भाजपकडून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.दुस-या जागेसाठी प्रसाद लाड यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.तर भाजपकडून दुस-यांदा संधी मिळावी यासाठी सदाभाऊ खोत यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी पक्षातील नवे चेहरे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.

Previous articleकाँग्रेसच्या आमदारांनी सोनिया गांधींकडे काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्याची तक्रार केली ?
Next articleप्रविण दरेकरांची भाई जगतापांना कायदेशीर नोटीस; माफी न मागितल्यास १०० कोटींचा दावा