विरोधी पक्षनेते अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट..भेटी मागील नेमकं कारण काय ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । यंदा राज्यभरात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतीचे नुकसान झाले असून,संपूर्ण खरीप पीकांचे मोठे नुकसान झाले आहे.नुकत्याच झालेल्या परतीच्या पावसामुळे रब्बीचा हंगाम सुध्दा धोक्यात आला असल्याने राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज केली.

आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून राज्यातील विविध प्रश्नासंबंधी त्यांच्याशी चर्चा केली.जून महिन्यापासून आजअखेर राज्यात सातत्याने पाऊस पडत आहे.या अतिवृष्टी आणि पूरामुळे शेतीचे मोठे नुकसान होवून खरीपाचे संपूर्ण पीक गेले आहे. रब्बी हंगामातील पेरणी केलेले पिकांचेही प्रचंड नुकसान झाले आहे.यामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे.राज्यातील बऱ्याच ठिकाणी पावसाने जमिनी वाहून गेल्या असून घरांचीही मोठ्या प्रमाणावर पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे स्थावर मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याने राज्यात तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा.तसेच राज्यातील शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नसल्याने एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या निकषाच्या बाहेर जाऊन तातडीने मदत देण्यात यावी अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.

महाराष्ट्रात कृष्णा नदीला कोयना,पंचगंगा,दुधगंगा व वारणा या उपनद्या मिळतात.महाराष्ट्र-कर्नाटक राज्याच्या हद्दीपासून सुमारे २३५ किलोमीटर अंतरावर कर्नाटक राज्यात कृष्णा नदीवर अलमट्टी धरण बांधण्यात आले आहे.अलमट्टी धरण बांधल्यापासून कृष्‍णा नदीपात्राच्या पाण्यात मोठया प्रमाणावर फुगवटा निर्माण होऊन नदीकाठच्या गावात पाणी घुसते.त्यामुळे नदीकाठची गावे,शेती व गुरे यांचे अतोनात नुकसान होते.कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती व आजपर्यंतच्या महापूर आणि अतिवृष्टी वेळची स्थिती पाहता अलमट्टी धरणाची उंची वाढविणे संयुक्तीक होणार नसल्याने राज्य सरकारने याविषयी केंद्रशासन व कर्नाटक सरकार यांचेकडे पाठपुरावा करुन अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याविषयी प्रखर विरोध करावा अशीही मागणी यावेळी पवार यांनी केली.

पुणे महानगरपालिकेमध्ये मागील ५ वर्षांमध्ये एकुण ३४ गावे समाविष्ट झाली आहेत.या गावामध्ये पायाभुत सुविधांची निर्मिती करण्यासाठी ९ हजार कोटींच्या निधीची मागणी महानगरपालिकेने शासनास केली आहे. महानगरपालिकेत समाविष्ट होऊनही पुरेसा निधी न मिळाल्याने ही गावे पाणी, ड्रेनेज, कचरा, रस्ते, आरोग्य अशा मुलभुत सुविधांपासून वंचित राहिली असून यामुळे या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. तरी या गावांच्या विकासासाठी तातडीने निधी उपलब्ध करुन द्यावा.पुणे जिल्ह्यातील वडगावशेरी विधानसभा मतदारसंघातील सिध्दार्थनगर नगररोड, पुणे या ठिकाणच्या नागरिकांची घरे २००९ साली कॉमनवेल्थ खेळासाठी रस्ता संपादित करुन नागरिकांना झोपडपट्टी पुनर्वसन तसेच पुणे महानगरपालिका आणि जेएनएनयुआरएम यांनी बाधीत नागरिकांचे पुनर्वसन करण्यात येईल असे आश्वासित केले होते. या घटनेला १३ वर्षे होऊनही बाधीत नागरिकांचे पुनर्वसन झाले नाही तरी त्यांचे तातडीने पुनर्वसन करावे अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात केंद्रीय मंत्री मंडळाची मान्यता तात्काळ मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करावा अशीही विनंती पवार यांनी केली.राज्यातील आशा सेविका आरोग्य सेवेचा कणा असल्याने आशा सेविकांना किमान वेतन लागू करावे अशीही मागणी त्यांनी केली.

Previous articleअन..पंकजा मुंडेंनी हायवेवरच्या हॅाटेलात स्वत : चहा बनवत मिसळ पावचा आस्वाद घेतला
Next articleएसटी कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजारांची दिवाळी भेट; बँक खात्यात रक्कम जमा होणार