मुंबई नगरी टीम
मुंबई । मुंबईतील घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या अपघातातील मृत्यू हे पालिका प्रशासन व राज्य सरकारच्या बेपर्वाईचे बळी आहेत. मुंबईत पावसाळ्यात अनेक दुर्घटना घडतात व दुर्घटना झाल्यानंतर महापालिका प्रशासन व राज्य सरकारला जाग येते. घाटकोपरची घटना हा त्यातीलच एक प्रकार असून मुंबईतील होर्डींग माफियांना महायुती सरकारचे संरक्षण आहे, असा घणाघाती आरोप करत या घटनेप्रकरणी राज्य सरकार व मुंबई महानगरपालिकेवरच सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
घाटकोपरमधील होर्डींग दुर्घटनेत आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू तर जवळपास ८८ जण जखमी झाल्याची दुर्घटना अत्यंवेदनादायी आहे. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत सरकारने जाहीर केली असली तरी ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. ही रक्कम वाढवून दिली पाहिजे तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च राज्य सरकार, मुंबई महानगरपालिकेने केला पाहिजे. राज्यातील महाभ्रष्टयुती सरकारमुळे मुंबईची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, कमशिनच्या हव्यासातून मुंबई शहर बकाल केले आहे. घाटकोपरमधील होर्डींग हे एक उदाहरण आहे, अशी हजारो होर्डींग अनधिकृत रितीने शहरभर झळकत आहेत. मुंबई महानगर पालिका, राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचे आशिर्वाद असल्याशिवाय असे अनधिकृत होर्डींग लावले जावू शकत नाहीत. घाटकोपरच्या होर्डींगला कोणी परवानगी दिली होती, त्यामागे कोणत्या राजकीय नेत्याची शिफारस होती का, या सर्वांची सखोल चौकशी करून खऱ्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे. कारवाईच्या नावाखाली कोणाला तरी बळीचा बकरा करुन महाभ्रष्ट युती सरकार आपली सुटका करुन घेऊ शकत नाही असेही पटोले म्हणाले.
दोषींवर कठोर कारवाई करा- रमेश चेन्नीथला
घाटकोपरमध्ये एक मोठे होर्डिंग कोसळून झालेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे, या घटनेत १४ लोक ठार तर ८० लोक जखमी झाले असून ही काही साधी घटना नाही. घाटकोपर दुर्घटनेची राज्य सरकारने सखोल चौकशी करुन या घटनेला जे लोक जबाबदार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे.चेन्नीथला यांनी राजावाडी हॉस्पिटला भेट देऊन घाटकोपर दुर्घटनेतील जखमींची विचारपूस केली व डॉक्टरांकडून माहिती घेतली. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेला राज्य सरकार व मुंबई महानगरपालिका प्रशासन जबाबदार आहे. दोन वर्षांपासून महानगरपालिकेत लोकप्रितिनिधी नाहीत कारण सरकारने निवडणूकच घेतलेली नाही. सर्व कारभार राज्य सरकारच्या निर्देशानुसार महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी चालवत आहेत. घाटकोपरची होर्डिंग दुर्घटना गंभीर असून या घटनेची संपूर्ण चौकशी केल्यानंतर सर्व बाबी स्पष्ट होतील, असेही चेन्नीथला म्हणाले.
चंदा लो, धंदा दो’ या महायुतीच्या धोरणामुळे होर्डिंग दुर्घटना-विजय वडेट्टीवार
मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेला महायुती सरकार जबाबदार आहे. सरकारच्या भोंगळ कारभारामुळं ही दुर्दैवी घटना घडली आहे. सरकारच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप माणसांचा जीव गेला. ‘चंदा लो, धंदा दो’ अशा पद्धतीने महायुतीचा कारभार सुरु असल्यामुळे अशा घटना घडत असल्याचा हल्लाबोल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.ही घटना प्रशासनाच्या आणि शासनाच्या दुर्लक्षामुळे झाली आहे. मुंबईचे पालकमंत्री पालिकेत निधी वाटप करायला बसतात. पण अशा घटनांकडे त्यांनी लक्ष दिले पाहिजे. एवढे मोठे होर्डिंग का उभे केले जाते याकडे कोणाचे लक्ष नाही. महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात हा प्रश्न आहे. फक्त टक्केवारीत सगळे अडकले आहेत असा आरोप वडेट्टीवार यांनी केला.