भाजपला पाठिंबा देणारे राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक बडतर्फ

मुंंबई नगरी टीम

मुंबई :  अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये पक्षादेश डावलून भाजपाला मतदान केल्याने  राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे तर जिल्हाध्यक्षांना अध्यक्षपदावर काढून टाकण्यात आल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केली आहे.
अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या १८ नगरसेवकांनी भाजपाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. राष्ट्रवादीच्या या पाठिंब्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती उघड होताच प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी या नगरसेवकांसह पक्षाचे आमदार आणि जिल्हाध्यक्षांना कारणे दाखवा नोटीस बजावली होती. आगामी लोकसभा निवडणूकीत याचा फटका बसू नये म्हणून राष्ट्रवादीने नगर मधिल १८ नगरसेवकांना पक्षातून बडतर्फ करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी केली आहे.

 नगर मध्ये पक्षाने कॉग्रेस पक्षाला मतदान करण्याचा आदेश असताना तो डावलण्यात आला. त्यानंतर पक्षाच्यावतीने त्यांना सात दिवसांमध्ये आपले म्हणणे मांडण्याची संधी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी नोटीसीद्वारे दिली होती परंतु यावर कोणताही खुलासा करण्यात आला नसल्याने पक्षाच्यावतीने कारवाई करण्यात आली तर जिल्हाध्यक्ष माणिकराव विधाते यांनी अशा प्रकारच्या पक्षविरोधी कारवाई होत असताना पक्षश्रेष्ठींना कोणती कल्पना दिली नाही किंवा घडलेल्या घटनेबाबत कोणताही खुलासा केला नसल्याने जिल्हाध्यक्ष  विधाते यांना पदावरून काढून टाकण्यात आले आहे .

Previous articleपानिपतचे युद्ध पराभवासाठी ओळखले जाते
Next articleसोमवारी मंत्रालयावर धडकणार ‘अर्धनग्न मोर्चा’