मुंबई नगरी टीम
सातारा : सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यामधिल औद्योगिक वसाहत टप्पा १, २ व ३ मधील प्रकल्पबाधित शेकडो शेतक-यांनी आपल्या न्याय हक्कासाठी सरकारच्या धोरणाच्या विरोधात आज शनिवारी खंडाळ्यातून अर्धनग्न मोर्चा काढला आहे. या आंदोलनाला आज दुपारी बारा वाजता सुरुवात झाली असून, अर्धनग्न प्रकल्पबाधितांनी घोषणा देत मुंबईच्या दिशेने कुच केली आहे.हा मोर्चा सोमवारी मंत्रालयावर धडकणार असल्याची माहिती शेतकरी किसान मंचचे अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी दिली आहे.
खंडाळा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांची भूसंपादनात फसवणूक झाली आहे. सरकारच्या डोळ्यावरील गांधारीची पट्टी दूर करण्यासाठी या अन्यायाविरोधात शनिवार दिनांक १२ जानेवारी रोजी खंडाळा तहसील कार्यालय ते मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनापर्यंत सर्व शेतकरी व खातेदारांनी अर्धनग्न मोर्चा काढण्याचा इशारा शेतकरी किसान मंचचे अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी दिला होता.त्यानुसार खंडाळा तालुक्यातील केसुर्डी, धनगरवाडी, शिवाजीनगर, खंडाळा, बावडा, म्हावशी, अहिरे, भादेसह दहा गावांमधील शेतकरी या अर्धनग्न मोर्चात सहभागी झाले आहेत. आज सकाळी आंदोलकांनी खंडाळा तहसील कार्यालय परिसरात जमून सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला. या ठिकाणी झालेल्या सभेत नेत्यांनी या मोर्चाचा हेतू सांगितला. त्यानंतर मोर्चाला सुरुवात होताच आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत मुंबईच्या दिशेने रवाना झाले. सोमवारी हा अर्धनग्न मोर्चा मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात घुसणार असल्याचा इशारा शेतकरी किसान मंचचे अध्यक्ष प्रमोद जाधव यांनी दिला.