युतीची चर्चा राज्य पातळीवर व्हावी

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील युतीची चर्चा प्रथम राज्य पातळीवर झाली पाहिजे.नंतर गरज पडलीच तर केंद्र स्तरावर व्हावी, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केले आहे.

ते म्हणाले की, युतीची चर्चा प्रथम राज्यपातळीवर होत असते. नंतर काही मुद्दे सुटले नाहीत तर ते केंद्राच्या पातळीवर सोडवण्यात येतात. सध्या दिल्लीत भाजप राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. त्यात युतीबाबत चर्चा होत नसते. मात्र राज्यात भाजप शिवसेना युती झाली पाहिजे, अशी भाजपची भूमिका आहे.आमचे म्हणणे लोकसभा निवडणुकीसाठी युती व्हावी असेच आहे. त्यांना युती नको असेल तर हे जनतेसमोर येऊ द्या  शिवसेनेला असे वाटत असेल की काही मुद्दे राज्यात सुटू शकत नाहीत तर त्या मुद्यांसंदर्भात दिल्लीत चर्चा होऊ शकते. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीत जागावाटप जवळपास ठरले आहे. युतीबाबत भाजप शिवसेना मागे पडले आहेत, असे वाटते का, या प्रश्नावर दानवे यांनी नकारार्थी उत्तर दिले. ते म्हणाले की, आमचीही तयारी जवळपास पूर्ण झालीच आहे. आम्ही गाफील नाही आणि स्वस्थ बसलेलो नाही. शिवसेनेने अखेरपर्यंत युती केली नाही तर भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी आहे, हेच त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले.

शिवसेना आता राज्यात लहान भाऊ आहे आणि भाजप मोठा भाऊ, याबाबत विचारले असता दानवे यांनी राजकारणात लहान आणि मोठा भाऊ असे काही नसते. कोण लहान आणि कोण मोठा भाऊ ते जनता ठरवेल, असे उत्तर दिले.

Previous articleसोमवारी मंत्रालयावर धडकणार ‘अर्धनग्न मोर्चा’ 
Next articleविखे पाटलांना पवारांचा दे धक्का