विखे पाटलांना पवारांचा दे धक्का

 मुंबई नगरी टीम

 पुणे: विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा संघर्ष नेहमीचाच आहे. मात्र पवार आता विखे पाटलांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर जोरदार धक्का देण्याच्या तयारीत आहेत. ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे पाटील यांचे जावई आणि राधाकृष्ण यांचे मेव्हणे निवृत्त आयएएस अधिकारी संभाजी झेंडे यांना राष्ट्रवादीत प्रवेशाची तयारी झाली आहे.

एका शेतकरी मेळाव्यात पवारांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत.झेंडे यांचे राष्ट्रवादी आणि भाजपसह सर्वच पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळचे संबंध आहेत.परंतु आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात त्यांनी राष्ट्रवादीतून करायचे ठरवले आहे.पुरंदर विधानसभा मतदारसंघातून संभाजी झेंडे यांना उतरवण्यात येणार असून ते शिवसेनेचे मंत्री विजय शिवतारे यांना लढत देतील.

झेंडे यांनी म्हाडा, एसआरए,म्हाडा दुरूस्ती मंडळ आदी अनेक ठिकाणी सीईओ म्हणून काम पाहिले आहे.झेंडे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांची अडचण झाली आहे. मुलगा सुजय विखे यांनी कॉंग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यास भाजपकडून लोकसभा लढवण्याचे जाहीर केले आहे. आता तर मेव्हणेही राष्ट्रवादीत गेले आहेत. राधाकृष्ण यांना पक्षातून विचारणा केली जाण्याची शक्यता आहे.

Previous articleयुतीची चर्चा राज्य पातळीवर व्हावी
Next articleफसवणूक सरकारकडून सिंदखेडराजाचीही फसवणूक