भाजपकडून मतांच्या राजकारणासाठी शिवस्मारकाचा वापर :चव्हाण    

मुंबई नगरी टीम

नांदेड : शिवस्मारक उभारणीच्या कामाला न्यायालयाच्या आदेशानुसार दिलेली  स्थगिती हे भाजपा सरकारचे अपयश आहे. शिवस्मारकावरून भाजपाने केलेले राजकारण केवळ मते मिळविण्यासाठी होते अशी टीका कॅाग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भूमिपूजन, जलपुजनाचे सोहळे जनतेच्या डोळ्यात केलेली धूळफेक होती. केवळ आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम भाजपा सरकार करत आहे.  शिवसेना-भाजपातील वाद म्हणजे वरून कीर्तन आतून तमाशा असा प्रकार सुरु आहे. भाजपा-शिवसेनेकडून सुरु असलेली ही राजकीय नौटंकी या निवडणुकीत मतदार खपवून घेणार नाहीत असेही चव्हाण यावेळी म्हणाले.

 बेस्टच्या कर्मचा-यांनी पुकारलेल्या संपाने मुंबईकरांची प्रचंड कोंडी झाली होती. यासही भाजपा-शिवसेना जबाबदार आहे. शिवसेनेने बेस्टची लूट केली आहे असा  आरोपही  चव्हाण यांनी यावेळी केला.  बेस्ट कर्मचार्‍यांचा संप मागे घेण्यासाठी न्यायालयालाच हस्तक्षेप करावा लागला ही बाब सरकारचे अपयश आहे असेही  चव्हाण म्हणाले.बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या महाआघाडीतून खासदार व्हावेत ही आमची इच्छा आहे. महाआघाडीत अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यावेत यासाठी त्यांच्यासोबत नुकतीच बैठक झाली आहे. ते महाआघाडीत सहभागी होतील असा विश्वास यावेळी चव्हाण यांनी व्यक्त केला.

Previous articleनिवडणुकीच्या तोंडावर सरकारला ओबीसींचा कळवळा : भुजबळ
Next articleडोंबिवलीतील  शस्त्रसाठा दंगली घडवण्यासाठी आणला असण्याची शक्यताः सावंत