मुंबई नगरी टीम
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मनसे आणि राष्ट्रवादी यांच्यातील वाढत्या जवळीकीची चर्चा जोरात होती. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच काल मनसेला महागठबंधनमध्ये स्थान नसल्याचे स्पष्ट केले. राज ठाकरे निवडणूक होईपर्यंत आमच्याबरोबर राहतील, असे वाटत नाही, असे पवार म्हणाले.यानंतर आज राज ठाकरे यांनी पुढील रणनीती ठरवण्यासाठी आपल्या निवासस्थानी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली. राष्ट्रवादीची साथ नसल्याने पुढे काय, यावर चर्चा केली जात आहे.
काही प्रश्नांवर राज ठाकरे आमच्याबरोबर असले तरीही निवडणुकीत एकत्र नसतील असे सांगत पवारांनी या चर्चेवर पडदा टाकला. त्यामुळे आता मनसेची अवस्था कठीण झाली आहे. राष्ट्रवादीसोबत साधले ली जवळीक फुकट गेली,अशी मनसेची अवस्था आहे. मुंबईत मनसे तीन जागा लढवण्यास उत्सुक असून तेथे आघाडीने उमेदवार देऊ नये असा प्रस्ताव ठेवण्याची शक्यता आहे. त्या बदल्यात मनसे महाराष्ट्रात आघाडीला मदत करेल. हा प्रस्ताव आघाडी मान्य करणार का याची उत्सुकता आहे. या बैठकीस बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पवार यांची मुलाखत राज ठाकरे यांनी घेतल्यापासून राज आणि राष्ट्रवादी यांची जवळीक वाढल्याची चर्चा होती. त्यात राज ठाकरे आणि पवारांनी एकत्र विमान प्रवास केला. त्यामुळे तर या चर्चेला बळकटी मिळाली. पण आता हा प्रश्न निकाली निघाला आहे. मनसे आता काय भूमिका घेणार याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.