अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला : शरद पवारांची मोठी घोषणा

अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला : शरद पवारांची मोठी घोषणा

मुंबई नगरी टीम

सोलापूर : विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादीचे  अध्यक्ष शरद पवार  यांच्यातील वाद संपुष्टाच येण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अहमदनगर लोकसभेची जागा काँग्रेसला सोडणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा आज केली असल्याने विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांचा नगर मधून निवडणुक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अकलूज येथे आज राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आले असता त्यांनी  अहमनगरची जागा काँग्रेसला सोडणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे विखे पाटील पिता पुत्रासह काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.विधानसभेतील विरोधी नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांचे पुत्र सुजय विखे यांनी कोणत्याही परिस्थितीत अहमदनगर मधूनच लोकसभा लढवण्याचा निर्धार  केला होता.नगरची जागा राष्ट्रवादी सोडत नाही,ही त्यांची मुख्य अडचण होती . राष्ट्रवादीने नगरची जागा न सोडल्यास  स्वतंत्र जिल्हा विकास आघाडी स्थापन करण्याचा विचार सुजय विखे यांनी केला होता.या मुळे आघाडीत बिघाडी झाली असती. परंतु शरद पवार यांनी केलेल्या या घोषणेमुळे विखे पिता पुत्राचा जीव भांड्यात पडला आहे. परवाच विखे यांनी दिल्लीला जावून वरिष्ठांशी याबाबत चर्चा केली होती.

सुजय विखे यांनी दोन वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे. आजोबा बाळासाहेब विखे पाटील आणि वडील राधाकृष्ण विखे यांनी तयार करून दिलेला आयता मतदारसंघ त्यांना मिळाला असला तरीही सुजय यांनी स्वतः काम करून आपला ठसा उमटवला आहे. आरोग्य शिबीर राबवून त्यांनी स्वतःसाठी स्थान तयार केले आहे.काँग्रेसला नगरची जागा मिळावी म्हणून विखे पाटील यांनी जंग जंग पछाडले. दिल्लीपर्यंत जाऊन आले. परंतु. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी दाद दिली नव्हती. नगरची जागा राष्ट्रवादीकडेच राहील,हे त्यांनी सातत्याने सांगितले. ही जागा काँग्रेसला न सोडल्यास सुजय विखे स्वतंत्र लढेल,अशी घोषणा केल्यावर काँग्रेसमध्ये वातावरण पेटले होते.

१९९० मध्ये बाळासाहेब विखे पाटील यांनी जिल्हा विकास आघाडी काढून काँग्रेसला शह दिला होता. तसाच प्रयोग पुन्हा करण्यासाठी विखे यांच्यावर समर्थकांचा दबाव येत होता.किंवा मग भाजपमध्ये जायचा पर्याय शिल्लक होता. मुख्यमंत्री फडणवीस आपल्या या मित्रासाठी पायघड्या घालून तयार होतेच. भाजपकडेही नगरमध्ये तुल्यबळ उमेदवार नसल्याने विखे पाटील आले तर भाजपला मोठा फायदा झाला असता. शिवाय बाळासाहेब विखे यांनी शिवसेनेशी घरोबा केला होता.त्यामुळे भगवे पक्ष विखेना अपरिचित नव्हते, मात्र पवार यांनी आज केलेल्या घोषणेमुळे काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे.

 

 

 

 

 

Previous articleविजयसिंह मोहिते पाटलांना राज्यसभेवर पाठविणार : पवार
Next articleपोलीस पाटलांना मिळणार ६५०० मानधन