अखेर कोकणातील नाणार प्रकल्प रद्द

अखेर कोकणातील नाणार प्रकल्प रद्द

मुंबई नगरी टीम    

मुंबई : कोकणातील बहुचर्चित तेल शुद्धीकरण प्रकल्प अखेर रद्द झाला आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे हा प्रकल्प होणार होता, मात्र शिवसेनेच्या  प्रखर विरोधामुळे अखेर रद्द करण्यात आला आहे. हा प्रकल्प रद्द करण्याच्या अटीवर शिवसेनेने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घेतला होता. नाणार येथील प्रकल्प रद्द करण्याच्या आदेशावर मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी स्वाक्षरी केल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

कोकणातील प्रस्तावित नाणार येथिल तेल शुध्दीकरण प्रकल्पाला शिवसेनेने जोरदार विरोध केला होता. तर या प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेनेतील संबंध कमालीचे ताणले गेले होते. शिवसनेा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प रद्द करण्याची ग्वाही  नाणार मधिल स्थानिकांना दिली होती.तर या प्रश्नवारून शिवसेना  आणि भाजप मध्ये आरोपप्रत्यारोप होत होते. आगामी लोकसभा निवडणुकीत युती करायची असेल तर नाणारचा प्रकल्प रद्द करण्याची अट शिवसेनेने भाजपला  घातली होती. त्यानुसार भाजपने होकार देत हा प्रकल्प रद्द करण्याचे आश्वासन देत युतीची घोषणा केली. नाणार येथील प्रकल्प रद्द करण्याच्या आदेशावर आज मुख्यमंत्री  फडणवीस यांनी स्वाक्षरी केल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. हा निर्णय म्हणजे शिवसेनेचा मोठा विजय मानला जात असून, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना या मुद्दयाचा लाभ उठविण्याची शक्यता आहे.

नाणार प्रकल्पाला स्थानिकांसह १४ गावांचा विरोध होता.आता जेथे विरोध नसेल अशा ठिकाणी हा प्रकल्प हलवला जाणार आहे. राजापूर तालुक्यातील १४ आणि देवगड तालुक्यातील दोन गावांमध्ये या प्रकल्पाचा विस्तार असणार होता. १३ हजार एकरांवर हा प्रकल्प साकारण्यात येणार होता.नाणार प्रकल्पासाठी तीन लाख कोटी रूपये खर्च येणार असून सौदीच्या आरामको कंपनीशी नुकताच भारताने करारही केला आहे.नाणार प्रकल्प रद्द केला असला तरीही भाजपची डोकेदुखी वाढणार आहे. जठार यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून हा प्रकल्प रद्द करण्यास विरोध केला होता. हा प्रकल्प आम्हाला हवा असून, यामुळे कोकणात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल असेही जठार म्हणाले होते. यासाठी आपण स्वतंत्र निवडणूक लढवू,असा इशाराही त्यांनी दिली आहे. याचा फटका शिवसेना आणि भाजपाला बसू शकतो.

 

 

Previous articleदुष्काळ निवारण्यासाठी केंद्राची राज्याला ४,७१४.२८ कोटींची मदत
Next articleधनगर समाजाला आदिवासीच्या योजना लागू