हा माणुस काय करेल माहित नाही

हा माणुस काय करेल माहित नाही

मुंबई नगरी टीम 

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येवून शरद पवारांचे बोट धरून राजकारणात आलो असे सांगतात परंतु मला भयंकर काळजी वाटू लागली आहे की, हा माणुस काय करेल माहित नाही अशी भीती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.

बारामती लोकसभा मतदारसंघातील दौंड येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची जाहीर सभा उमेदवार खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ पार पडली.यावेळी त्यांनी मोदींनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्याचा शिवाय भाजप अध्यक्षांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीत येवून गेले, त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री फडणवीस येवून गेले आणि त्या स्मृती इराणी सुद्धा येणार आहेत. काय कौतुक आहे यांना सगळे बारामतीत येत आहेत. आम्ही साधे सुधे आहोत का संपुर्ण देश बारामतीत येतोय अशी मिश्किल टिप्पणी करतानाच देशाचं अख्ख मंत्रीमंडळ बारामतीत येतंय हे चांगलंच आहे असा टोलाही लगावला.

बारामतीत भाजपाचे अध्यक्ष अमित शहा आले होते. त्यांनी शरद पवार यांनी काय केले म्हणे… असे डुलत डुलत आले असं वाक्य उच्चारताच जनतेतून ‘अफझलखान’ अशी जोरदार वाक्य ऐकायला आली त्यावेळी शरद पवार यांनी मी तसं म्हणणार नाही ते शिवसेनेवाले त्यांना बोलतात असा टोला लगावतानाच अरे अमित शहा तुझ्या राज्यातील ऊस कारखानदारांचे प्रश्न घेवून तिथले लोक तुझ्याकडे येत नाहीत तर माझ्याकडे दिल्लीत ते प्रश्न घेवून येतात. राष्ट्रीय शुगर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष आपले दिलीप वळसे पाटील आहेत तर खासगी ऊस कारखानदार संघटनेचे देशाचे अध्यक्ष रोहित पवार आहेत यांची आठवणही शरद पवार यांनी करुन देताना त्यांच्या पाठीशी कुणीतरी उभा आहे ना म्हणून हे घडतेय आणि हा अमित शहा म्हणतोय क्या किया है सांगत आहे अशी जोरदार टिका शरद पवार यांनी अमित शहा यांच्यावर केली.

आम्ही ७० वर्षात काय केले असे मोदी विचारत आहेत परंतु त्यातील दहा वर्षे तुम्ही काय केले हे सांगा. मोदींनी राज्यात ७ सभा घेतल्या. त्या सभांमध्ये एकच विषय फक्त शरद पवार होता. मी शेतीच्या प्रश्नात राजकारण करत नाही असे सांगतानाच आज देशात व राज्यात असलेल्या सरकारने चांगली कारखानदारी करणारी शक्ती उभी केली नाही असा आरोपही शरद पवार यांनी केला.

या जाहीर सभेत दौंडचे राहुल कुल यांच्या डबघाईला आलेल्या कारखान्याबाबत आणि त्याने मजुरांचे व स्थानिक ऊस उत्पादकांची थकवलेली कर्जे यावर भाष्य करताना ऊस उत्पादकांचे वाटोळे करु नको असा सल्लाही दिला.सभेत शरद पवार यांनी देशातील तीन खासदार आहेत त्यामध्ये पहिला क्रमांक हा सुप्रिया सुळे यांचा लागत असल्याचे सांगत अशा संसदरत्नाला पुन्हा एकदा संसदेत पाठवा असे आवाहन केले.

Previous articleराज ठाकरेंची भाषणे म्हणजे करमणूक
Next articleराजेंद्र गावीतांना शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजाचा पाठिंबा