आदित्य ठाकरेंनी ईशान्य मुंबईतील कार्यकर्त्यांसोबत साधला संवाद
मुंबई नगरी टीम
मुंबई : जो राजकीय पक्ष निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यांच्या सभांना जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत, असून मुंबईकर पुन्हा एकदा महायुतीच्या पाठिशी ठामपणे उभे राहतील असा विश्वास युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. ईशान्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांच्या प्रचारासाठी ते गुरूवारी ईशान्य मुंबईत आले होते. संपुर्ण महाराष्ट्रात भगवा माहौल असून मुंबईतील सहाच्या सहा मतदारसंघातही भगव्याचाच विजय होईल, असा दावाही त्यांनी यावेळी केला.
भांडूप येथील शिवसेनेच्या दोन शाखांना भेटी देत युवासेवा अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी महायुतीच्या प्रचारासाठी जीवाचे रान करणाऱ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी महायुतीचे उमेदवार मनोज कोटकही त्यांच्यासोबत होते. यावेळी बोलताना आदित्य ठाकरेंनी देशात पुन्हा एकदा मोदींच्या नेतृत्वाखालील मजबूत सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला. लोकसभेच्या प्राचारादरम्यान आपण राज्यभर फिरलो असता, संपुर्ण महाराष्ट्रात भगवा माहौल असल्याचे ते म्हणाले. शिवाय फक्त ईशान्य मुंबईतच नव्हे तर मुंबईतील सर्व मतदारसंघात युतीचे उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी होतील, असेही ते म्हणाले. मनोज कोटक यांना शुभेच्छा देताना ते म्हणाले की, मनोज कोटक यांचे महापालिकेतील काम आपण स्वत: पाहिले आहे. मुंबईशी संबंधीत विविध धोरणात्मक मुद्द्यांवर कोटक यांची भुमिका मला नेहमीच भावलेली आहे. त्यामुळे मी स्वत: फोन करून त्यांना प्रचारासाठी येत असल्याचे सांगितले. ते फक्त महायुतीचे उमेदवार नाहीत, तर मुंबईचे प्रतिनिधीत्व करणारे आपले दिल्लीतील प्रतिनिधी असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
















