विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या
मुंबई नगरी टीम
मुंबई : ईव्हीए मशिनमध्ये मोठा घोळ झाला असून, जे जिंकले आहेत त्यांना जिंकून कसे आलो याबाबत शंका आहे. तर मतदारांना त्यांनी कुणाला मतदान केले ते समजले पाहिजे असे सांगतानाच महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या अशी मागणी केंद्रिय निवडणूक आयुक्तांकडे केली असल्याची माहिती मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिल्लीत केंद्रिय निवडणुक आयुक्तांची भेट घेवून निवेदन दिले. त्यानंतर बोलताना राज ठाकरे यांनी वरील माहिती दिली. निवडणूक आयोगाकडून शून्य अपेक्षा असून,या भेटीत त्यांच्याशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर जे काही हावभाव होते त्यावरूनच हे लक्षात आले की, त्यांना आमच्या बोलण्यात काहीही स्वारस्य नाही असे ठाकरे म्हणाले. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी राज ठाकरे यांनी यावेळी केली. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी ईव्हीएमच्या विरोधात भाजपने आवाज उठवला होता. मात्र २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी हा विषयच सोडून दिला असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला . काही मतदारसंघांमध्ये घोळ असून, जेवढ्या लोकांनी मतदान केले आहे त्यापेक्षा जास्त मतदान नोंदवले गेलं आहे. त्यामुळे पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान घेतले पाहिजे. भारतासारख्या देशात निवडणूक महिनाभर किंवा दोन महिने चालते तिथे मतमोजणीला दोन दिवस गेले तर काय बिघडते असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.