कल्याण ते तळोजा मार्गावर मेट्रो धावणार

कल्याण ते तळोजा मार्गावर मेट्रो धावणार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  कल्याण ते तळोजा या मेट्रो मार्गाच्या (मुंबई मेट्रो मार्ग १२) सविस्तर प्रकल्प अहवालास तसेच या प्रकल्पाची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत अंमलबजावणी करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

या मार्गाची एकूण लांबी २०.७५ किमी असून हा संपूर्ण उन्नत मार्ग असेल. यामध्ये एकूण १७ स्थानके असतील. या प्रकल्प पूर्णत्वाची किंमत सुमारे ५ हजार ८६५ कोटी रुपये इतकी आहे. मार्च २०२४ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात एमएमआरडीए व राज्य सरकार यांच्यासह सिडको आणि एमआयडीसी यांचाही सहभाग असणार आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या परवानग्या देत असतानाच हा प्रकल्प निकडीचा सार्वजनिक प्रकल्प आणि महत्त्वपूर्ण नागरी वाहतूक प्रकल्प म्हणून घोषित करणे, त्यासोबत आवश्यकतेनुसार विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून एमएमआरडीएला नियुक्त करणे या बाबींनाही मान्यता देण्यात आली आहे.

कल्याण-डोंबिवली या शहरांची वाढती लोकसंख्या आणि आजुबाजूला होणारा विकास, २७ गावांचा विकास आराखडा, कल्याण ग्रोथ सेंटर, नैना क्षेत्र, कल्याण-डोंबिवली ही शहरे नवी मुंबईला जोडण्याची गरज, त्यासाठी परिवहन सेवांची आवश्यकता या सगळ्या बाबी लक्षात घेऊन हा प्रकल्प आखण्यात आला आहे. परिणामी, या मार्गामुळे कल्याण, तळोजा, नवी मुंबई, नवी मुंबई विमानतळ या क्षेत्रातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. मेट्रो ५ ठाणे-भिवंडी-कल्याण, नवी मुंबई मेट्रो मार्ग आणि मेट्रो १२ कल्याण ते तळोजा यांचे एकात्मिकरण करण्याचेदेखील प्रस्तावित आहे. यामुळे प्रवाशांना सुलभ प्रवास करणे शक्य होणार आहे.

Previous articleवडाळा-सीएसएमटी मेट्रो मार्गास मंत्रिमंडळाची मान्यता
Next articleमिरा-भाईंदर-वसई विरारसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय