१५ हजार ‌शेतक-यांच्या आत्महत्या हे सरकारचे अपयश

१५ हजार ‌शेतक-यांच्या आत्महत्या हे सरकारचे अपयश

मुंबई नगरी टीम

अहमदनगर : भाजप  शिवसेनेच्या राज्यात आतापर्यंत १५ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे सरकारचे अपयश आहे असा  आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी अहमदनगरच्या जाहीर सभेत केला.

राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा आज अहमदनगर येथे आली असता येथे झालेल्या सभेत पवार बोलत होते. सगळ्या जनतेने गुण्यागोविंदाने नांदावे ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. हे राज्य सुजलाम सुफलाम कसे होईल याकडे राष्ट्रवादीचे लक्ष आहे असेही पवार म्हणाले. आज बेकारीने तोंड वर काढले आहे. तरुण आज नोकरीसाठी वणवण फिरत आहेत. सरकार उद्योगांना पोषक वातावरण तयार करत नाही असा आरोपही पवार यांनी केला. उद्याची निवडणूक भारताची नाही तर महाराष्ट्राची आहे. चांदा ते बांदापर्यंत महिला सुरक्षित नाहीत. हे सरकारचे अपयश आहे. सरकारने किती तरुणांना नोक-या दिल्या. व्यापारांना काय दिले असा सवाल करतानाच गोरगरीबांना महागाईने वेढले आहे. आपल्या राज्याला या भाजप सरकारने कर्जबाजारी केले आहे अशी टीकाही त्यांनी केली.

गेल्या ५४ वर्षात राज्यावर अडीच लाख कोटीचे कर्ज होते परंतु युती सरकारने पाच वर्षात ५ लाख कोटीचे कर्ज करुन ठेवले असून,नियोजनाचा अभाव या सरकारकडे आहे अशी टीका पवार यांनी केली.आमच्या विचाराचे सरकार दिले आणि आमची सत्ता दिली तर स्थानिकांना नोकरीत ७५ टक्के जागा देण्याचा कायदा करु असे सांगतानाच राज्यातील काही लाख जागा रिक्त आहेत त्या दोन महिन्यात लागलीच भरण्याचे आश्वासन  पवार यांनी दिले.लाखाचा पोशिंदा समाधानी नाही. त्याच्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. आम्ही शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता मात्र या सरकारच्या काळात शेतकऱ्यांमध्ये दरी निर्माण करण्याचे काम झाले आहे असेही  पवार यांनी सांगून, शिवस्वराज्य यात्रेला आशिर्वाद द्या, पाठिंबा द्या असे आवाहनही  पवार यांनी केले.अहमदनगर शहराला ३५० कोटीचे पॅकेज देतो असे मुख्यमंत्री यांनी जाहीर केले होते परंतु हे पॅकेज अद्याप मिळालेले नाही फक्त गाजर दाखवण्याचे काम केले आहे असा आरोप पवार यांनी केला.नव्या स्वराज्याचा नवा लढा आपल्याला लढायचा आहे त्यासाठी नगरकरांनी साथ द्यावे असे आवाहन  पवार यांनी केले.

Previous articleसंजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानात वाढ
Next articleराज्यातील अभूतपूर्व पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा