मंत्री पंकजा मुंडेंच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण बीड जिल्हा ‘वॅाटरग्रीड’ प्रकल्पाने व्यापणार

मंत्री पंकजा मुंडेंच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण बीड जिल्हा ‘वॅाटरग्रीड’ प्रकल्पाने व्यापणार

मुंबई नगरी टीम

मुंबई :  मराठवाड्याला टंचाईतून कायमचे बाहेर काढण्यासाठी महत्वाकांक्षी अशी ‘मराठवाडा वॉटर ग्रीड’ योजना राबविण्यात येत असून राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नांमुळे बीड जिल्हयाचा या प्रकल्पात समावेश झाला आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्याच्या चार हजार २९३ कोटींच्या कामाबरोबरच  बीड जिल्ह्याच्या चार हजार ८०० कोटींच्या कामांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजूरी मिळाली आहे.

मंत्री पंकजा मुंडे आणि पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज संयुक्तपणे मराठवाडा वॅाटरग्रीड योजनेचा प्रकल्प अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. मराठवाड्यातील अकरा धरणे लूप पद्धतीने एकमेकांना जोडण्यात येवून पिण्याचे पाणी, शेती व उद्योगासाठी लागणा-या पाण्याचा प्रश्न याद्वारे   सोडविण्यात येणार आहे.मराठवाडयातील सततच्या पाणी टंचाईवर कायमस्वरुपी मात करुन पिण्याच्या पाण्यासाठी ४० एलपीसीडी या दरडोईनुसार लूप पध्दतीने पाईपलाईनची ग्रीड करुन अशुध्द पाणी ठोक स्वरुपात गावांजवळ पोहोचविण्यासाठी ग्रीडची निर्मिती करणे या प्रकल्पाचा उद्देश आहे. बीड जिल्हयाच्या वॉटर ग्रीड योजनेचा अंदाजे ४ हजार ८०१ कोटी ८६ लक्ष एवढया रक्कमेचा सविस्तर प्रकल्प अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करत असताना पंकजा मुंडे यांनी जिल्हयातील कामांना तात्काळ मान्यता देऊन कामे सुरु करण्याची मागणी केली.या प्रकल्पाने संपूर्ण जिल्हा व्यापला जाणार असून अकराही तालुक्यांना याचा फायदा होणार आहे. जिल्हयासाठीच्या यायोजनेत एकूण एक हजार ७९ कि.मी. लांबीच्या पाईप लाईनचा समावेश आहे.आष्टी, पाटोदा, शिरुर ५३  दशलक्ष लिटर्स प्रति दिन, बीड व गेवराई ११२  दशलक्ष लिटर्स प्रति दिन, परळी व अंबाजोगाई तालुक्यासाठी ३५ दशलक्ष लिटर्स प्रति दिन, केज, धारुर व वडवणीसाठी ३५ दशलक्ष लिटर्स प्रति दिन, माजलगाव साठी २० दशलक्ष लिटर्स प्रति दिन असा पांच जलशुध्दीकरण केंद्रातून एकूण २५५ दशलक्ष लिटर्स प्रति दिन पाणी पुरवठा होणार आहे.या कामाचे नियोजन, अंमलबजावणी, परिचालन व देखभाल दुरुस्ती महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मार्फत करण्यात येणार आहे.

 

काय आहे  मराठवाडा वॉटर ग्रीड

  • मराठवाड्यात पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी व उद्योगासाठी लागणारे पाणी यांची एकत्रीत ग्रीड करण्यात आलेली आहे.
  • दुसऱ्या टप्प्यात दमन गंगा-पिंजाळ, तापी-नार-पार व कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी आणि कृष्णा खोऱ्यातील ७ टी. एम. सी. पाणी मराठवाड्याकडे वळविण्याचे नियोजन आहे.
  • प्रत्येक जलसंपदा प्रकल्पाची वैयक्तिक विश्वासार्हता कमी असल्यामुळे ती वाढविण्याच्या दृष्टीने मराठवाडा पाणी ग्रीड ही लूप पद्धतीची प्रस्तावित आहे.
  • मराठवाडा ग्रीडमध्ये १ हजार ३३० किलो मीटर मुख्य पाइपलाइन असून ११ धरणे (जायकवाडी, निम्न दुधना, सिध्देश्वर, येलदरी, इसापुर, विष्णूपुरी, माजलगाव, निम्न मनार, मांजरा, निम्न तेरणा व सिना कोळेगाव, ) लूप पध्दतीने जोडण्यात येणार आहेत.
  • त्यानंतर जलशुध्दीकरणाची प्रक्रीया करुन तालुक्यापर्यंत शुद्ध पाणी वाहून नेण्यासाठी ३ हजार २२० किलो मीटर दुय्यम पाईप लाईन प्रस्तावित आहे.

 

Previous articleआंबेनळी बस दुर्घटनेतील वारसांना अनुकंपा तत्वावर नियुक्ती
Next articleगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात व‍िमात शेतकऱ्यासह कुटुंबातील एका सदस्याचाही समावेश