मुघलशाहीत वतनदार जावून मिळत होते त्यावेळी फक्त मावळा लढत होता

मुघलशाहीत वतनदार जावून मिळत होते त्यावेळी फक्त मावळा लढत होता

मुंबई नगरी टीम

सातारा :  सध्या राष्ट्रवादी सोडून अन्य पक्षात जाणा-या नेत्यांचा समाचार राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे झालेल्या सभेत घेतला आहे. आदिलशाही, मुघलशाहीत वतनदार जावून मिळत होते त्यावेळी फक्त मावळा लढत होता तीच परिस्थिती आज पहायला मिळत आहे असे इतिहासातील उदाहरण देवून कोण पक्ष सोडून गेले तरी राष्ट्रवादीचे मावळे लढतील असा विश्वास त्यांनी निर्माण केला.

शिवस्वराज्य यात्रेचे आज सातारा जिल्ह्यातील दहिवडी येथे आगमन झाल्यानंतर झालेल्या सभेत राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पक्ष सोडून जाणा-यांचा समाचार घेतला. राष्ट्रवादीला आताच छत्रपती शिवाजी का आठवले असे बोलणा-या लोकांना सांगतो, जेव्हा तुम्ही जयजयकार करायला लागण्याअगोदर शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्यायला सुरुवात केली होती हे लक्षात घ्या असे प्रत्युत्तर खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भगव्यावर बोलणा-या सत्ताधाऱ्यांना दिले.राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादीच्या झेंडयासोबत शिवरायांचा भगवा का आठवला असा सवाल सत्ताधारी करायला लागले आहेत. त्यावर डॉ. अमोल कोल्हे यांनी सणसणीत उत्तर दिले आहे. आदिलशाही, मुघलशाहीत वतनदार जावून मिळत होते त्यावेळी फक्त मावळा लढत होता तीच परिस्थिती आज पहायला मिळत आहे असेही अमोल कोल्हे यांनी इतिहासातील उदाहरण देवून कोण पक्ष सोडून गेले तरी राष्ट्रवादीचे मावळे लढतील असा विश्वास निर्माण केला. दिल्लीत दाखवतात ५६ इंचाची छाती आणि महाराष्ट्रात तीच छाती कमी का होते असा सवालही अमोल कोल्हे यांनी केला.

ज्यांनी स्वतः चा स्वाभिमान गहाण ठेवला आहे ते आज पक्षातून गेले आहेत त्यामुळे आम्हाला काही वाईट वाटणार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आपली स्पष्ट भूमिका दहीवडी येथील जाहीर सभेत मांडली. या सभेत जयंत पाटील यांनी पक्षांतर करणा-या पक्षातील लोकांचा चांगलाच समाचार घेतला.माणूस दुस-या कामासाठी भेटला तरी पक्षात प्रवेश कधी करणार असे विचारले जाते हे पक्षाचे मुख्यमंत्री आहेत की राज्याचे अशी विचारणा करतानाच भाजपाने राजकीय व्यभिचार वाढवला आहे अशी जोरदार टीकाही  पाटील यांनी केली. शरद पवारांना सोडणारा लोकांच्याबद्दल चीड निर्माण झाल्यानेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठया संख्येने शिवस्वराज्य यात्रेत सहभागी होत आहेत.नवीन चेहरे, नवे नेतृत्व उदयाला येत आहेत. त्यामुळे तुमची सर्वांची ताकद शरद पवार यांच्या पाठीशी उभी करण्याची वेळ आली आहे असे आवाहन पाटील यांनी केले.

आघाडीशी बेईमानी केली त्यांना पुन्हा निवडून न देण्याचे काम आपल्याला करायचे आहे असे आवाहनही पाटील यांनी केले. ८० वर्षाचा शरद पवार नावाचा हा तरुण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कोणताही प्रश्न निर्माण झाला तर सर्वांच्या आधी पोचतो आहे त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्धार केला पाहिजे असेही पाटील यांनी सांगितले. लोकसभेला आघाडीचा धर्म पाळला नाही त्याचं काय करायचे हे शोधण्याचे काम शिवस्वराज्य यात्रा करणार असल्याचेही पाटील म्हणाले.

Previous articleराज्यातील ५० आश्रमशाळांचे इंग्रजी, सेमी इंग्रजीत रूपांतरण
Next articleज्येष्ठ साहित्यिक आणि कलावंतांच्या मानधनात दीडपट वाढ