…तर हर्षवर्धन पाटील आज खासदार असते

…तर हर्षवर्धन पाटील आज खासदार असते

मुंबई नगरी टीम

मुंबई :  काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला.यावेळी मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा यांनी हर्षवर्धन पाटलांचे तोंडभरून स्तुती केली.हर्षवर्धन पाटील आधी भाजपात आले असते तर आज ते खासदार असते असे चंद्रकांतदादांनी सांगितले,

काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज भाजपात प्रवेश केला.गरवारे क्लब येथे झालेल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी प्रवेश केला.सध्याच्या परिस्थितीत निष्ठा, तत्व आणि प्रामाणिकपणे काम करायचे असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही असे सांगून, आपण भाजपामध्ये प्रवेश करताना कोणतीही अट घातलेली नाही. पक्ष जी जबाबदारी देईल ती पार पाडू असे पाटील यांनी स्पष्ट केले. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणे हा आपल्यासाठी ऐतिहासिक दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या शंभर दिवसात घटनेचे कलम ३७० रद्द करण्यासोबत अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कणखरपणे सरकारचे नेतृत्व केले आहे. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारच राज्याला न्याय देऊ शकेल, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे असेही हर्षवर्धन पाटील म्हणाले.

हर्षवर्धन पाटील यांचे आपण मनापासून स्वागत करतो. त्यांनी दीर्घकाळ लोकप्रतिनिधी म्हणून काम केले आहे. त्यांनी प्रशासनामध्ये आपल्या कार्यपद्धतीने ठसा उमवटला आहे. त्यांचा योग्य सन्मान भाजपाकडून केला जाईल असे  प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.हर्षवर्धन पाटील आधीच ( लोकसभा निवडणूकीपूर्वी ) भाजपात आले असते तर ते आज खासदार असते असे चंद्रकांतदादा म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत आपल्या राज्य सरकारने अनेक समस्यांना तोंड दिले आणि सकारात्मक पद्धतीने धाडसाने निर्णय घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मजबूत नेतृत्वाखाली निश्चित दिशेने काम केल्यामुळे राज्यातील भाजपा महायुती सरकारने अडचणीतून मार्ग काढला. आपल्या समस्यांवर हेच सरकार तोडगा काढू शकते व आपल्याला न्याय देऊ शकते, असा विश्वास जनतेमध्ये निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीत जशी सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जनतेची भावना होती, तशीच सकारात्मकता जनतेमध्ये आता विधानसभा निवडणुकीच्या वेळी आहे. राज्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुती सरकार मोठ्या बहुमताने विजयी होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय विचारांच्या पक्षात प्रवेश करून हर्षवर्धन पाटील यांनी योग्य निर्णय घेतला आहे. त्यांच्या अनुभवामुळे पक्षाला बळकटी मिळेल.

Previous articleनरेंद्र मोदींच्या महासभेने महाजनादेश यात्रेचा नाशिकमध्ये समारोप  
Next articleकोल्हापूर सांगलीमध्ये विधानसभेच्या निवडणूका ठरल्याप्रमाणेच