शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रण

शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रण

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई : भाजपाच्या नेत्यांनी आज राज्यपालांची भेट घेवून सत्ता स्थापन करण्यास असमर्थता दर्शविल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला सरकार स्थापन करण्यासाठी पत्र पाठवून आमंत्रण दिले असून, उद्या सोमवारी सायंकाळपर्यंत सरकार स्थापन करण्यासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी वेळ दिली आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची दोनदा बैठक झाली. मात्र आवश्यक संख्याबळाची जुळवाजुळव होत नसल्याने सरकार स्थापन करण्यास भाजपने असमर्थता दर्शविली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या शिष्टमंडळाने राजभवनावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकार स्थापन करणार नसल्याचे सांगितले. आम्ही राज्यपालांची भेट घेऊन भाजपा सरकार स्थापन करू शकत नाही, अशी माहिती दिल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भाजपाने सत्तास्थापनेस असमर्थता दर्शविल्यानंतर दुसरा मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेला राज्यपालांनी सरकार स्थापनेसंदर्भात विचारणा केली आहे.शिवसेना विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांना त्यासंदर्भात पत्र पाठविले आहे.सरकार स्थापन करण्यासंदर्भात उद्या सोमवारी सायंकाळपर्यंत राज्यपालांना उत्तर द्यायचे आहे.दिवसभरातील वेगवान घडामोडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आहे.तर संजय राऊत हे उद्या काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार  आहेत.

Previous articleसरकार स्थापन करण्यास भाजपा असमर्थ
Next articleपाठिंब्याची पत्रे न मिळाल्याने शिवसेना “वेटिंगवर”