सरकार स्थापन करण्यास भाजपा असमर्थ

सरकार स्थापन करण्यास भाजपा असमर्थ

मुंबई नगरी टीम

मुंबई: राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सत्ताधारी भाजपाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांची भेट घेवून सरकार स्थापन करू शकत नसल्याचे सांगितल्याने आता सत्तास्थापनेचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात भाजपाने टोलविला आहे.आता सर्वात दुसरा मोठा पक्ष म्हणून राज्यपाल शिवसेनेला सरकार स्थापनेसाठी विचारणा करतील.

शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्याने गेली पंधरा दिवस राज्यात सत्ता संघर्ष सुरू होता. काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाजपाला पत्र पाठवून सरकार स्थापन करण्यासंदर्भात विचारणा केली होती. राज्यपालांच्या या प्रस्तावावर आज वर्षा निवास्थानी झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीत यावर चर्चा करण्यात आली.मात्र या बैठकीत तोडगा न निघाल्याने पुन्हा दुपारी कोअर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीत सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर भाजपाच्या शिष्टमंडळाने राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली आणि भाजपा सरकार स्थापन करू शकत नसल्याचे सांगितले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी याबाबत घोषणा केली. या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, पंकजा मुंडे आणि गिरीष महाजन उपस्थित होते.

राज्यातील जनतेने सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला कौल दिला आहे. परंतु भाजप सत्ता स्थापन करणार नाही. जनादेशाचा अपमान करुन शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करायची असेल तर त्यांना शुभेच्छा, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शिवसनेनेला लगावला. राज्यातील जनतेने भाजप, शिवसेना, आरपीआय, रासपसह इतर मित्रपक्षांना सत्तास्थापनेसाठी कौल दिला आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे आम्ही सत्तास्थापन करायला हवी. परंतु शिवसेना आमच्या सोबत येत नसल्यामुळे आम्ही सत्तास्थापन करु शकत नाही. परंतु शिवसेना जर जनादेशाचा अपमान करुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्तास्थापन करु इच्छित असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Previous articleराज्यपालांनी भाजपकडे बहुमत आहे की नाही याची खात्री करायला हवी
Next articleशिवसेनेला सरकार स्थापनेसाठी राज्यपालांचे निमंत्रण