मी नाराज असल्याची बातमी चुकीची: खडसे
मुंबई नगरी टीम
मुंबई : भाजपा मध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेवून सुमारे अर्धा तास चर्चा केली. मात्र हि भेट येत्या १२ तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्याकडून आयोजन करण्यात आलेल्या स्वाभिमान मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी घेतली असल्याचे खडसे यांनी सांगून,आपण नाराज असल्याची बातमी चुकीची आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपात नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानभवनात भेट घेवून सुमारे अर्धा तास चर्चा केल्याने अनेक तर्क-वितर्क लढविले जात होते.मात्र आजची भेट हि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर आयोजित केलेल्या स्वाभिमान मेळाव्याचे निमंत्रण देण्यासाठी होती असे एकनाथ खडसे यांनी भेटीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.शरद पवार यांच्यानंतर पंकजा मुंडे यांची भेट घेवून खडसे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर खडसे वेगळा निर्णय घेणार का अशी चर्चा होती.मात्र आपण नाराज असल्याची बातमी चुकीची आहे असे त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर स्पष्ट केले.
काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीविषयी बोलताना खडसे म्हणाले की, जळगावमधील सिंचन प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी मी पवार यांची भेट घेतली. आजही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी त्याबाबतच चर्चा केली.येत्या १२ तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्याकडून स्वाभिमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे निमंत्रण मुख्यमंत्र्यांना दिले.स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक औरंगाबाद येथे उभे राहावे यासाठी आपण जमीन उपलब्ध करुन दिली होती. मात्र स्मारक अद्याप उभे राहू शकले नाही. या स्मारकासाठी ३० ते ४० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. आजच्या भेटीत उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या माध्यमातून घोषणा व्हावी अशी विनंती त्यांना केली असल्याची माहिती खडसे यांनी दिली.मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली आहे. प्राधान्याने या स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. कॅाग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांशी माझी जवळीक आहे.माझ्या सारखा कार्यकर्ता आपल्या पक्षात आल्यास त्याचा फायदा होईल असे त्यांना वाटत असावे मात्र मी नाराज असल्याची बातमी चुकीची आहे.मी कोणताही निर्णय घेतलेला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.