उदयनराजे भोसलेंना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही : नवाब मलिक

उदयनराजे भोसलेंना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही : नवाब मलिक

मुंबई नगरी टीम

मुंबई : उदयनराजे भोसले भाजपात गेल्यानंतर त्यांना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी पत्रकार परिषदेत कुठेही निषेध केला नाही किंवा भाजपच्या विरोधात काही बोलले नाही. याचा अर्थ इतरांकडे बोट दाखवून त्यांची लाचारी काय आहे हे दाखवून देत आहेत अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष आणि मंत्री नवाब मलिक यांनी उदयनराजे भोसले यांचा खरपूस समाचार घेतला.

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज साता-यात पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली होती. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे.उदयनराजे भोसले हे काही मिळते का म्हणून भाजपात गेले होते आणि आता पुढे काही मिळते का यासाठी ते लाचारीने बोलत आहेत असा थेट आरोपही मलिक यांनी केला आहे.जाणता राजा हा शब्द शरद पवार स्वतः ला लिहिला नाही.जाणता राजाच्या अर्थ आहे की, ज्याला सर्व विषयांची जाण आहे. पक्षाने त्या शब्दाचा कधी वापर केला नाही.आदित्यनाथ आणि गोयल मोदींचे सरळ नाव घेवून सांगत आहेत त्यावर उदयनराजे काही बोलले नाहीत, याकडेही मलिक यांनी लक्ष वेधले आहे.शिवाय आम्ही शिवआघाडी असे नाव कधी ठेवले नाही. आमचे महाराष्ट्र विकास आघाडी असे नाव आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

गोयल नावाच्या व्यक्तीकडून मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. असे एक पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे राज्यासह देशात विरोधाचे वातावरण निर्माण झाले. काल रात्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितले की, त्या लेखकाने माफी मागून पुस्तक मागे घेतले आहे. परंतु आमची माहिती अशी आहे की, ते लेखक पुस्तक मागे घ्यायला तयार नाहीत,माफी मागायला तयार नाही त्यामुळे भाजपच्या कार्यालयात जावडेकर आणि गोयल यांनी एकत्र बसून पत्रकार परिषद घ्यायला हवी आणि गोयल यांनी जाहीर माफी मागून पुस्तक मागे घेत आहे असे जाहीर करावे अशी स्पष्ट मागणीही मलिक यांनी केली.
दरम्यान जोपर्यंत पुस्तक मागे घेत नाही आणि जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत देशातील जनता गप्प बसणार नाही असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

Previous articleमंत्री उदय सामंतांनी घेतली शरद पवारांची भेट
Next articleभाजपा छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही : चंद्रकांत पाटील