भाजपा छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही : चंद्रकांत पाटील

भाजपा छत्रपतींचा अपमान सहन करणार नाही : चंद्रकांत पाटील

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज असल्याचा पुरावा मागणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या घराण्याचा आणि साताऱ्याच्या गादीचा अपमान केला आहे. संजय राऊत यांच्या या मस्तवाल विधानाचा आपण निषेध करतो. छत्रपतींच्या घराण्याचा हा अपमान भाजप आणि राज्यातील शिवप्रेमी जनता सहन करणार नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सांगितले. शिवसेनेला आता छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार उरला नसून, या अपमानाबद्दल शिवसेनेने माफी मागितली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

पाटील म्हणाले की, राज्यात विश्वासघाताने सत्तेवर आल्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांच्या डोक्यात मस्ती गेली आहे, हेच संजय राऊत यांच्या आजच्या विधानावरून दिसत आहे. शिवसेना या उद्दाम सवालाशी सहमत आहे का, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले पाहिजे. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर कारवाई केली तरच त्यांच्या भूमिकेबद्दल लोकांची खात्री पटेल.

ते म्हणाले की, माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी शिवसेनेवर आणि विशेषतः संजय राऊत यांच्यावर केलेली टीका राऊत यांना झोंबली असेल तर ते समजू शकते. त्यांना शक्य असेल तर त्यांनी छत्रपतींच्या सवालांना उत्तरे द्यायला हवी होती. पण छत्रपतींना उत्तर देता येत नाही तर थेट त्यांच्या वंशाचा पुरावा मागणे हे उद्दामपणाचेच लक्षण आहे. एकीकडे छत्रपती शिवाजी महाराजांची थोरवी सांगायची आणि दुसरीकडे त्यांच्या वंशजांबद्दल अशी खालच्या दर्जाची टिप्पणी करायची हे शिवसेनेची वैचारिक दिवाळखोरी दाखवणारे आहे.

Previous articleउदयनराजे भोसलेंना भाजपसमोर लोटांगण घातल्याशिवाय पर्याय नाही : नवाब मलिक
Next articleसतेज पाटील कोल्हापूरचे पालकमंत्री