दहशतवाद,नक्षलवादाशी लढा देण्यासाठी पोलीसांनी कठोर तयारी करावी

दहशतवाद,नक्षलवादाशी लढा देण्यासाठी पोलीसांनी कठोर तयारी करावी

मुंबई नगरी टीम

मुंबई : पोलीसांनी तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये गुन्हेगारांपेक्षा नेहमीच एक पाऊल पुढे असले पाहिजे. गुन्ह्यांची उकल करण्यासह संभाव्य गुन्ह्यांवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या मानसिकतेचा तसेच त्याच्या तंत्रांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे, असा संदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिला.दहशतवाद तसेच नक्षलवादाशी लढा देण्यासाठी महाराष्ट्र पोलीसांनी आणखी कठोर तयारी करावी, असेही ते यावेळी म्हणाले.

पोलीस मुख्यालयात राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अर्धवार्षिक परिषदेमध्ये मुख्यमंत्री ठाकरे मार्गदर्शन करत होते.महाराष्ट्र सुरक्षित ठेवणारे शूरवीर असा पोलीस दलाबद्दल गौरवोल्लेख करुन मुख्यमंत्री म्हणाले की, कोणतीही नवीन योजना प्रशासन आणि पोलीस यंत्रणेच्या भरवशावर आणली जाते. योजनेच्या अंमलबजावणी दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याकामी पोलीस दलाचे महत्त्वपूर्ण योगदान असते.आज गुन्ह्यांच्या स्वरुपात आणि गुन्हेगारांमध्ये खूप बदल झाला आहे. पोलीस दलामध्ये ज्याप्रमाणे उच्चशिक्षित, तंत्रशिक्षित येत आहेत. त्याचप्रमाणे गुन्हेगार,नक्षलवादीदेखील सुशिक्षत असल्याचे दिसून येते. त्यामुळे गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्यासाठी गुन्हेगारांच्या तंत्राचा, मानसिकतेचा अभ्यास करुन तपास पद्धतीत वारंवार सुधारणा करत राहिले पाहिजे. सिंगापूरसारख्या देशात प्रत्येक नागरिकाला पोलीसी प्रशिक्षण बंधनकारक आहे. तर दुसरीकडे दहशतवादी कारवायांसाठी मुलांना वयाच्या ६- ७ व्या वर्षांपासून प्रशिक्षित केले जाते. हे देखील समोर आले आहे. त्यामुळे अशा आव्हानांचा आपल्याला सामना करायचा असेल तर यासंबंधीचे शिक्षण शालेय पातळीपासूनच द्यावे लागेल.असेही ठाकरे म्हणाले.

पोलीसांनी निःस्वार्थी, निःस्पृहपणे काम करुन त्यांच्याकडे येणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. गुन्ह्यामध्ये वेगवान तपास करुन आश्वासक कामगिरी केली पाहिजे. राज्य पोलीस दलाला आवश्यक सायबर लॅब, फॉरेन्सिक लॅब, आधुनिक तपास सामग्री दिली जाईल; पोलीसांच्या घरांचे प्रश्न मार्गी लावले जातील. विभागाला निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

पोलीसातील माणसाच्या मागे राज्यशासन खंबीरपणे उभे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पोलीसांसाठी मूलभूत सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे लक्ष देण्यात येईल. पोलीस गृहप्रकल्पांसाठी राज्यशासन आवश्यक ती तरतूद करेल. मात्र, केंद्र शासनाकडूनही अधिकाधिक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा केला जावा. पोलीसांच्या गृहप्रकल्पांची कामे दर्जेदार व्हावीत. ती वेळेत पूर्ण झाली पाहिजेत.वॉरंट बजावण्यासाठी जाताना तसेच गुन्हेगारांना ताब्यात घेऊन येताना पोलीसांना एसटीच्या साध्या बसचा प्रवास लागू आहे. मात्र, वेगवान हालचालींची आवश्यकता लक्षात घेता शिवनेरी, आरामगाड्यांचा प्रवास अनुज्ञेय करण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही पवार यावेळी म्हणाले.

यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यावेळी म्हणाले की, जगभरात ड्रोन हल्ल्याच्या घटना घडत असल्याचे दिसून येते. हे एक नवीन आव्हान समोर आहे. याचा सामना करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करुन कार्यान्वित करण्याची गरज आहे. पोलीस खात्यामध्ये आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर कसा करता येईल याचाही विचार व्हावा. नवी मुंबई मध्ये महापे येथे ‘महाराष्ट्र सायबरच्या मुख्यालयाच्या कामाला गती द्यावी, राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी कायदा व सुव्यवस्था महत्त्वाची ठरते. सुव्यवस्था असलेल्या राज्यात आर्थिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात येते. राज्य पोलीस दल उत्कृष्ट काम करत असल्यामुळे राज्यात चांगली गुंतवणूक होत आहे. नक्षलवादाचा सामना करण्यासाठी छत्तीसगड, तेलंगणासोबत समन्वयाने काम व्हावे. मानवी तस्करीच्या घटनांमध्ये संवेदनशीलपणे काम करुन अशा घटनांना आळा घालावा. अवैध सावकारीविरोधातही कठोर कारवाई करण्यात यावी असेही त्यांनी सांगितले.पोलीस दलाने सतत नाविन्याचा शोध घेतला पाहिजे. काही शहरे, जिल्ह्यात पोलीस दलाने अत्यंत नाविन्यपूर्ण संकल्पना राबविल्या आहेत. मुंबईमधील मोबाईल पोलीस स्टेशन, पुण्यामधील स्वागत कक्ष, नागपूर पोलीसांची महिलांसाठीची होम ड्रॉप स्कीम यासारख्या नाविन्यपूर्ण योजना राज्यात राबविल्या पाहिजेत, असे सांगून पोलीस भरती प्रक्रिया लवकर मार्गी लावण्यात येईल, असेही ते म्हणाले.

Previous articleसर्वसामान्य नागरिकांना दिलासा : आता आयुक्त कार्यालयात “मुख्यमंत्री सचिवालय कक्ष”
Next articleमुख्यमंत्र्यांची मध्यस्थी यशस्वी : शिर्डीकरांचा बंद मागे