मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी यशस्वी : शिर्डीकरांचा बंद मागे

मुख्यमंत्र्यांची मध्यस्थी यशस्वी : शिर्डीकरांचा बंद मागे

मुंबई नगरी टीम

मुंबई : साईबाबांचे जन्मस्थान पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिल्यानंतर साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद सुरू होवू शिर्डीच्या ग्रामस्थांनी बंद पुकारला होता. या वादावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज एका बैठकीचे आयोजन केले होते.पाथरी विकास आराखड्यास हरकत नसल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांनी यावेळी जाहीर करीत शिर्डी बंद मागे घेण्यात आल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या औरंगाबाद दौ-यात साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली होती.या मंजूरीनंतर शिर्डीकर आणि पाथरी येथील नागरिकांमध्ये साईबाबांच्या जन्मस्थळावरून वाद सुरू झाला होता.शिर्डीतील नागरिकांनी बेमुदत बंद पाळण्याची घोषणा केल्यानंतर या वादावर तोडगा काढण्यासाठी शिर्डीकरांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित केली होती.आज झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मध्यस्थी यशस्वी झाली. पाथरी येथील तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला औरंगाबाद येथील बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर या विकास आराखड्यास हरकत नसल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांनी बैठकीत जाहीर केले.

शिर्डी ग्रामस्थांची भूमिका मांडताना साईभक्तांच्या भावना लक्षात घेऊन बंद पाळला.यापूर्वी जन्मस्थळाबाबत शासनाची कुठलीच भूमिका नव्हती अशीच भूमिका आता असावी असा मुद्दा आमदार विखे- पाटील यांनी यावेळी मांडला.ग्रामस्थांनी श्रद्धा आणि सबुरी ठेवावी. औरंगाबाद येथे झालेल्या विभागीय बैठकीत आपण पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे या भागाचा देखील विकास व्हावा, अशी भूमिका आहे अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत मांडली.मुख्यमंत्र्यांच्या या यशस्वी मध्यस्थीनंतर पाथरीच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला आमची हरकत नसल्याचे शिर्डीच्या ग्रामस्थांनी यावेळी स्पष्ट केले. याबैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर आदींसह शिर्डी ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleदहशतवाद,नक्षलवादाशी लढा देण्यासाठी पोलीसांनी कठोर तयारी करावी
Next article……तर डॉ.आंबेडकर स्मारकाचे काम दोन वर्षांत पुर्ण: शरद पवार