अन्यथा अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही : दरेकर

मुंबई नगरी टीम
मुंबई : गेल्या २४ दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला महाविकास आघाडी सरकारकडे वेळ नाही हे दुदैव आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जर मराठा समाजाच्या उमेदावारांच्या प्रश्नाला न्याय नाही मिळाला तर येत्या २४ फेब्रुवारी पासून सुरु होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.

आझाद मैदानात आपल्या मागण्यांसाठी गेल्या २४ दिवसांपासून आंदोलनाला बसलेल्या मराठा समाजाच्या उमेदवारांची विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज भेट घेतली.यावेळी मराठा समाजातील युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, मराठा समाजाचे तरुण-तरुणी गेले चोवीस दिवस आंदोलन करत आहेत, पण यासंदर्भात विद्यमान सरकारची भूमिका बेफिकीरीची आहे.आज चोवीस दिवस हे आंदोलनकर्ते आपले घरदार सोडून आझाद मैदानात उन्हा तान्हात बसले आहेत. राज्यकर्ते म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काल साजरी करण्यात आली. छत्रपतींचे नाव घेऊन रयतेचे राज्य आम्ही द्यायचे असे सांगतो, मात्र त्याच रयतेचे घटक ,पाईक, मावळे येथे उपेक्षित बसले आहेत. त्यांची काळजी घ्यायला सरकारला वेळ नाही, जर मराठा समाजाच्या उमेदवारांना आंदोलन करुनही न्याय मिळत नसेल तर महापुरुषांच्या जयंत्या कशासाठी साज-या कराव्यात अशी खंतही दरेकर यांनी व्यक्त केली.

दरेकर म्हणाले की,राज्यात कुठेही आक्रस्ताळापणा न करता जगात नोंद होईल असे लाखोंचे मोर्चे काढून मराठा समाजाने आपली ताकद आणि शक्ती काय आहे दाखवून दिले आहे. हा समाज एकजूट झाल्यास काय वातावरण निर्माण होते हे सर्वांनी पाहिले आहे. या ताकदीची दखल शासनाला, प्रशासनाला घ्यावी लागली आणि कायद्यात बसणारे आरक्षण मराठा समाजाला मिळाले. परंतु, तशाच प्रकारची पुनरावृत्ती मराठा समाजाने आताही करावी का असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
दरेकर म्हणाले की, मराठा आरक्षण लागू होण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला होता. आंदोलनाला बसलेल्या मराठा तरुणांना भेटण्यासाठी फडणवीस या ठिकाणी येणार होते, परंतु न्यायालयाच्या कामानिमित्त त्यांना नागपूर येथे उपस्थित राहणे आवश्यक असल्यामुळे ते येऊ शकले नाही.पण दरेकर यांनी आंदोलनाच्या ठिकाणावरुन मराठा उमेदवारांचे फडणवीस यांच्यासमवेत फोनवरुन बोलणे करुन दिले. हा प्रश्न सोडविण्यासाठी भाजप मराठासमाजाच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे असे फडणवीस यांनी त्यांना आश्वस्त केले.

मराठा समाजाच्या सुमारे ३५०० विद्यार्थ्यांच्या नियुक्ती संदर्भात संभ्रम अवस्था निर्माण केली जात आहे पण तशी वस्तुस्थिती नाही. कलम १८ अन्वये पूर्वलक्षी प्रभावाने आरक्षण लागू होऊ शकते,पण महाविकास आघाडीचे सरकार आणि सरकारी अधिकारी यामध्ये खोडा घालत आहेत, अशी टिका करताना दरेकर यांनी स्पष्ट केले की, मराठा समाजाच्या उमेदवारांना न्याय मिळाला नाही तर विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात हा विषय लावून धरु व मराठा समाजाच्या तरुणांना न्याय मिळवून देऊ. राज्यात कुठेही आंदोलने झाली की तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस त्या आंदोलनकर्त्यांना चर्चेला बोलवत आणि त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र आता २४ दिवस उलटूनही मराठा समजाच्या तरुणाच्या आंदोनलनाबाबत महाविकास आघाडीचे सरकार संवेदनहीन असल्याची टिका दरेकर यांनी केली.मराठा समाजातील ३५०० विद्यार्थ्यांना आरक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या नोकऱ्या नियमानुसार आरक्षित केल्या जातील. हे करताना इतर समाजातील युवकांसोबत अन्याय होणार नाही, त्याचीही दक्षता सरकारने घेतली पाहिजे असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous articleमहाराष्ट्र सदनातील “त्या” अधिका-यावर अखेर कारवाई; आदित्य ठाकरेंचे आदेश
Next articleअल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात २ हजारांवरुन ४ हजार रुपयांपर्यंत वाढ