राज्यातील सर्व विद्यापीठे,महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी

मुंबई नगरी टीम
परीक्षा पुढे ढकलल्या,३१ मार्च नंतर परीक्षा होणार
प्राध्यापकांना घरी राहून काम करण्याची परवानगी
खाजगी क्लासेस बंद ठेवणार

मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून राज्यातील सर्व महाविद्यालय,विद्यापीठे येत्या ३१ मार्च पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.तसेच ३१ मार्चच्या अगोदर नियोजित असलेल्या सर्व परीक्षा रद्द केल्या असल्याची माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेली ग्रामीण व शहरी भागातील सर्व महाविद्यालये,विद्यापीठे तसेच परवानगी असेलेले खाजगी क्लासेस बंद ठेवण्यात येणार आहेत.२६ किंवा २७ दरम्यान राज्यातील कोरोना बद्दलची परिस्थिती पाहण्यासाठी आढावा घेण्यात येवून पुढील निर्णय घेण्यात येईल.या नियमांचे सर्व महाविद्यालयांनी आणि विद्यापीठांनी तंतोतंत पालन करणे बंधनकारक असल्याचे सामंत यांनी सांगितले.प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचा-यांना घरी राहून काम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे.वसतिगृहात राहणाऱ्या मुलांची काळजी घेण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांना घरी जाण्याची सुद्धा परवानगी देण्यात येत आली.राज्यात शिक्षण घेणारे जे विद्यार्थी परदेशात गेले आहेत, त्यांना देशात परत येण्यास निर्बंध घालण्यात आलेले आहेत. असे सांगून सामंत म्हणाले, विभागामार्फत पुढील अधिकृत सूचना येईपर्यंत कोणत्याही अफवांवर आणि माहितीवर विश्वास ठेऊ नये.

Previous articleराज्यातील कोरोना रुग्णांची संख्या २६ वर
Next articleराज्यातील १ हजार ५७० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलणार