भाजपा गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष : सामनातून टीका

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात कोरोना बाधीत रूग्णांचा आकडा दररोज वाढतच आहे. राज्यात सध्या  लॉकडाउनच्या परिस्थितीत असल्याने विनाकारण घराच्या बाहेर पडणा-यांना पोलिस लाठीचा प्रसाद देत आहे. यावरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस नाराजी व्यक्त करतानाच सरकारवर  टीका केली होती. त्या टीकेचा समाचार आज सामन्याच्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे.भाजपा हा गांभीर्य नसलेला विरोधी पक्ष असल्याची टीका या अग्रलेखात करण्यात आली आहे.

राज्यातील सध्याच्या परिस्थितीत विनाकारण घराच्या बाहेर पडणा-यांवर पोलिस लाठीमार करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त करीत सरकारवर हल्लाबोल केला होता.फडणवीस यांनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार आजच्या सामनाच्या अग्रलेखातून घेण्यात आला आहे. एका व्यक्तीच्या चुकीमुळे शंभरजणांना, आणि त्या शंभरांतून पुढच्या हजारांना कोरोनाची बाधा होणार असेल तर  एका व्यक्तीच्या पार्श्वभागावर दंडुका मारणे ही समाजसेवा आणि आरोग्यसेवाच आहे असे अग्रलेखात म्हटले आहे. अशा परिस्थितीत पोलिसांना दंडुका का वापरावा लागतो, याचा विचार प्रमुख विरोधी पक्षाने करायला हवा.  विरोधी पक्षांनी मुख्यमंत्री मदतनिधीसारख्या महत्त्वाच्या बाबतीतही सवतासुभा केला आहे. अशा गांभीर्य नसलेल्या विरोधकांच्या डोक्यावर एखादा दंडुका पडल्याशिवाय त्यांचे डोके ठिकाणावर येणार नाही अशा शब्दांत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर हल्लाबोल केला आहे.

Previous articleCoronavirus : कोरोनाचा सामना करण्यासाठी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष टीम सज्ज
Next article३०० युनिट पर्यंतचे वीज बिल माफ करा : सुधीर मुनगंटीवार