अंधश्रध्देच्या मागे जाणे अयोग्य : शरद पवार

मुंबई नगरी टीम

मुंबई : महात्मा ज्योतिबा फुले यांनी अंधश्रध्देचे कधीच समर्थन केले नाही त्यामुळे अंधश्रध्देच्या मागे आपण जाणे योग्य नाही. अंधश्रद्धा ही माणसाला दैववादी बनवते आणि ज्यावेळी माणूस दैववादी बनतो त्यावेळी माणसातील चिकित्सा करण्याची प्रवृत्ती आणि विचारांची चिकित्सा करण्याचा मार्ग थांबतो. म्हणून काही झाले तरी माणसाने चिकित्सक असलं पाहिजे. अंधश्रद्धेचा पुरस्कार करता कामा नये. दैववादी असता कामा नये. ज्ञानाचं समर्थन करण्याची भूमिका अखंडपणे स्वीकारली पाहिजे आणि त्या रस्त्याने आपण जाण्याचा निर्धार करुया असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून केले.

दरम्यान आपण गेले १३ दिवस कोरोना संकटातून बाहेर पडण्यासाठी जी खबरदारी पंतप्रधान असोत किंवा मुख्यमंत्री असोत यांनी घेण्याच्या सूचना केल्यात त्या आपण पाळुयात व येणाऱ्या काळातही पाळून कोरोनाचा सामना यशस्वीतेने घालवून जिंकतो हा इतिहास करुया असे आवाहनही  पवार यांनी केले.आज पुन्हा एकदा शरद पवार यांनी जनतेशी सोशल मिडियाच्या माध्यमातून संवाद साधला.यावेळी शरद पवार यांनी ‘मित्रो’ असे बोलून आपल्या संवादाची सुरुवात केली.आज सर्व सामाजिक स्तर, जात, धर्म या सर्वांनी एकजुटीने राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही परिस्थितीत कटूता वाढेल, गैरसमज होतील, संशय वाढेल ही स्थिती येवू देता कामा नये असे आवाहन करतानाच टेलिव्हिजनवर बघतो त्याहीपेक्षा व्हॉटसअप वरुन जे काही मेसेज येतात ते मेसेज थोडेसे काळजी करणारे आहेत आणि काही मेसेजची तपासणी केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ५ मेसेज आले तर त्यापैकी ४ मेसेज खोटे असतात. हे खोटे मेसेज देवून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याची काळजी घेतली जात आहे आणि काही वास्तव चित्र पुढे आले त्याबद्दलची पुन्हा पुन्हा मांडणी करून गैरसमज निर्माण करण्याचे कुणाचे आयोजन आहे का? याची शंका निर्माण होत आहे असेही पवार म्हणाले.

दिल्लीतील निजामुद्दीनचा झालेला प्रकार. ते संमेलन होते. खरंतर अशाप्रकारचे संमेलन घ्यायलाच नको होते. या संमेलनाला ज्यांनी कुणी परवानगी दिली असेल ती परवानगी देण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. असे स्पष्ट करतानाच महाराष्ट्रात काही ठिकाणी अशाप्रकारचे संमेलन घेण्याबाबतची विनंती धार्मिक संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. परंतु राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी विचार करून परवानगी नाकारली त्यामुळे अशी खबरदारी दिल्लीत घेतली असती तर अशी विचारणाही  पवार यांनी केली.दरम्यान टेलिव्हिजनवर पुन्हा पुन्हा एखाद्या घटकाचे, एखाद्या समाजाचे चित्र वेगळया पध्दतीने मांडण्याचे प्रयत्न करुन त्यातून सांप्रदायिक ज्वर वाढेल की काय अशाप्रकारची परिस्थिती निर्माण केली जातेय ती करण्याची संधी मिळाली नसती असेही पवार यांनी सांगितले.सोलापूर जिल्हयातील एका गावात बैल आणि घोड्याच्या शर्यती ठेवण्यात आल्या होत्या. हजारो लोक यावेळी जमणार होते. मात्र पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आज सोलापुरात जी तत्परता दाखवली गेली त्यामुळे तिथले प्रकार तिथेच थांबले तसे आज तशी तत्परता जर दिल्लीत दाखवली असती तर आज जे काही घडतंय त घडलं नसतं. आणखी एक गोष्ट जे दिल्लीत घडलं ते रोज टेलिव्हिजनवर दाखवायची गरज आहे का? रोज रोज दाखवून कोणती परिस्थिती निर्माण करू पहातो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे असा सवाल करतानाच यातील जाणकार लोक याबाबतची खबरदारी घेतील असा विश्वासही पवार यांनी व्यक्त केला.

आज खरी गरज काळजी घेण्याची आहे आणि त्यानंतर दोन स्टेजेस फार महत्वाचे आहेत. एक संपूर्ण देशाच्या अर्थकारणावर होणारा विपरीत परिणाम व समाजाच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम. या दोन गोष्टींमुळे काही गोष्टी घडतील असे दिसतंय. जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे बरेच दिवस उद्योग व व्यवसाय बंद राहिले. या सर्वांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल आणि हे निव्वळ देशाच्याच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या अर्थकारणावर परिणाम करणार आहे असे सांगतानाच रिझर्व्हं बँकेचे माजी गव्हर्नर के राजन यांनी या परिस्थितीनंतर जी संकटं येणार आहेत त्यामध्ये सर्वाधिक मोठं संकट हे रोजगार कमी होवून रोजगार बुडण्याचे आहे. हे वाचनात आल्याचे शरद पवार यांनी सांगितले. दरम्यान या बुडणाऱ्या रोजगाराला तोंड कसं द्यायचं याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे की, अर्थकारणाला कसं तोंड द्यायचं याचा विचार करण्यासाठी काही जाणकार लोकांना आपण बोलवुया. ज्यांनी या सर्व क्षेत्रात काम केले आहे अशा लोकांचा सल्ला घेवूया आणि पुढचे सहा महिने, वर्षभर महाराष्ट्रात कशापध्दतीने पाऊल टाकून कोरोनामुळे अर्थकारणावर जे काही विपरीत परिणाम आहेत. जे बेरोजगारी व तत्सम प्रश्न निर्माण होतील यातून बाहेर कसं पडायचं याची काळजी घेण्यासाठी एकप्रकारचा ‘टास्कफोर्स’ नेमणं उपयुक्त आहे हे सांगितले.

केंद्र सरकारकडेही काही गोष्टींची अपेक्षा निश्चितपणे केली पाहिजे असे सांगतानाच केंद्र सरकारने या सर्व राज्यांना या अर्थकारणातून बाहेर काढण्यासाठी एक आर्थिक पॅकेज देण्याची मागणी शरद पवार यांनी केली आहे. याशिवाय देशातील शेती व्यवसायालासुध्दा एकप्रकारचे मार्गदर्शन करण्याची अपेक्षा  पवार यांनी केंद्र सरकारकडून केली.आपल्या देशात गव्हाचे प्रमाण उत्तर हिंदुस्थानात जास्त आहे तर तांदळाचे दक्षिणेकडे जास्त आहे. रब्बी हंगाम संपत आला आहे. गहू, तांदूळ अशी पीकं वर आली आहेत. मात्र ही पीकं अजूनही शेतातच आहे. त्यात हरभरा, गहू आहे ही सर्व पीकं वेळीच काढली नाही तर त्याचा परिणाम शेती अर्थव्यवस्थेवर होईल अशी भीती व्यक्त करतानाच पुढच्या दहा बारा दिवसात हा रब्बी हंगाम कशापध्दतीने घ्यायचा याप्रकारचे मार्गदर्शन केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने सर्व भाषेत सर्व राज्यात टेलिव्हिजन व अन्य मार्गाने करण्याचा कार्यक्रम आखण्याची आवश्यकता आहे याचा विचार निश्चितपणे केला जाईल असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.

Previous articleफडणवीसांना महाराष्ट्रात पूर आला तेव्हा हे का आठवले नाही ?
Next articleविद्यापीठ,महाविद्यालय,सीईटी परीक्षांचे वेळापत्रक नव्याने जाहीर होणार