देवेंद्र फडणवीसांच्या विरुध्द समाजमाध्यमांवर अश्लिल पोस्ट टाकणा-यांना अटक करा

मुंबई नगरी टीम

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरुध्द समाजमाध्यमांवर अश्लिल पोस्ट टाकणा-यांना व फेसबुकवर कमेन्ट करणा-या समाजकंटकाविरुध्द तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली आहे.

कोरोनोच्या संकटामुळे आज महाराष्ट्रासह देश अडचणीत आला आहे. या संकटाच्या सामना आज सर्वच जण एकत्रितपणे करित आहेत. महाराष्ट्रातही विरोधी पक्ष म्हणून राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करण्यात येत आहे. तरीही विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रत्येक कृतीला सामाजिक माध्यमांमध्ये असंसदीय शब्दात टीका केली जात आहे. घाणेरडी, अश्लिल व्यंगचित्रे पोस्ट करण्यात येत आहेत. ही टीका अत्यंत हीन दर्जाची आहे. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे माजी मुख्यमंत्री आहेत तसेच राज्याच्या राजकारणातील लोकाभिमुख सुसंस्कृत व निश्कलंक नेतृत्व आहे असे सांगतानाच, याचे भान न ठेवता काही भाड्याच्या एजन्सी व काही विकृत मानसिकता असणारे हा गलिच्छ प्रकार करित आहेत, त्यामुळे या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्यात यावी व फेसबुक पोस्ट व कमेन्ट टाकणा-या या समाजकंटकाविरुध्द तात्काळ गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी आज विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या एका शिष्टमंडळाने आज पोलिस उपायुक्तांकडे करण्यात आली. मुंबई पोलिस आयुक्तांच्या नावे देण्यात आलेले हे निवेदन  तातडीने पोलिस आयुक्तांकडे पाठविण्याची सूचना दरेकर यांनी यावेळी उपायुक्त स्वामी यांना केली.

दहिसर पूर्व येथे पोलिस उपायुक्त परिमंडळ १२ चे पोलिस उपायुक्त  स्वामी यांची आज भाजपच्या आमदारांनी भेट घेतली. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी पोलिस उपायुक्त स्वामी यांना निवेदन सादर केले. याप्रसंगी आमदार भाई गिरकर, आमदार मनिषा चौधरी, आमदार सुनिल राणे, भाजपा उत्तर मुंबईचे जिल्हाध्यक्ष गणेश खणकर   आदी उपस्थित होते. कोरोनाच्या संकटकाळात विरोधी पक्ष नेते फडणवीस यांच्या विरुध्द समाजमाध्यमांमध्ये सुरु असलेली असंसदीय टीका बंद होईल अशी आमची अपेक्षा होती, पण तरीही हीन दर्जाची टीका सुरु राहिल्यामुळे आज आम्ही ही तक्रार दाखल केली आहे. भाजपच्या एखाद्या कार्यकर्त्याने समाजमाध्यमांवर काही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास त्याच्या विरुध्द तातडीने कारवाई करण्याची तत्परता पोलिंसाकडून दाखविली जात आहे. जर कायदा सर्वांना समान असेल तर फडणवीस यांच्याविरुध्द पोस्ट टाकणा-या विकृत प्रवृतीविरुध्द आतापर्यंत कारवाई का करण्यात आली नाही असा सवालही दरेकर यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी फडणवीस यांच्या विरोधात समाजमाध्यमांवर टाकण्यात आलेल्या  काही आक्षेपार्ह पोस्ट पोलिस उपायुक्तांकडे सादर करण्यात आल्या. याप्रकरणी तातडीने पोलिसांच्या सायबर विभागाकडून चौकशी करण्यात यावी व या प्रकरणातील समाजकंटकांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात यावी अशी आग्रही मागणी दरेकर यांनी यावेळी केली. आम्ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला मानणारे कार्यकर्ते आहोत, परंतु आमचा संयम दुर्बलता समजू नये अन्यथा भाजपचे कार्यकर्ते जशास तसे उत्तर देतील असा इशाराही विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी यावेळी दिला.

Previous article५८३ नवीन कोरोनाबाधीत रुग्ण ; रुग्णांची संख्या १० हजार ४९८ वर पोहचली
Next articleगावाला जाण्यासाठी लागणारा अर्ज,नोडल अधिका-यांची नावे,मोबाईल नंबर पाहिजेत: तर करा फक्त एक क्लिक