मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आमदारकीचा मार्ग मोकळा; येत्या २१ मे रोजी निवडणूक

मुंबई नगरी टीम

मुंबई : अखेर राज्यावरील अस्थिरतेचे सावट दूर झाले आहे.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी कालच केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून विधानपरिषदेच्या रिक्त ९ जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती केली होती.त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राज्यातील विधानपरिषद निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार येत्या २१ मे रोजी ९ जागांसाठी निवडणूक होणार आहे.या निर्णयामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसल्याने येत्या २७ मेपर्यंत त्यांना एका सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक असल्याने त्यांची रिक्त असलेल्या एका जागेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करावी अशी शिफारस करण्यात आली होती.मात्र राज्यपालांनी त्यावर कोणतीच कार्यवाही न केल्याने राज्यावर अस्थिरतेचे सावट निर्माण झाले होते.गेल्याच आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यपालांना पुन्हा विनंती करण्याचा निर्णय झाला होता.त्यानंतर मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल यांची भेट घेवून प्रस्ताव सादर केला होता.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली जाणार नाही हे राज्यपालांनी स्पष्ट संकेत दिले होते.काँग्रेससह इतर छोट्या पक्षांनीही मुख्यमंत्र्यांची  नियुक्ती करण्याची विनंती केली होती.या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा करून कोरोनाच्या संकटात राज्यात सुरू असलेल्या राजकारणावरून नाराजी व्यक्त केली होती.विधान परिषदेच्या नऊ रिक्त जागांसाठी लवकरात लवकर निवडणूक घेण्याची विनंती राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला केली होती.

आज केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील रिक्त असलेल्या विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी  निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार येत्या २१ मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे.आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार या निवडणूकांची अधिसूचना येत्या ४ मे रोजी जारी करण्यात येणार असून,उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ११ मे आहे.१२ मे रोजी उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.१४ मे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.तर २१ मे रोजी या ९ रिक्त जागांसाठी मतदान घेण्यात येईल.निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केल्याने राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे राज्यावर करोनाचं संकट असतानाच राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची भीती होती.मात्र  निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलासा दिला आहे.

रिक्त झालेल्या जागा-भाजप  ३, राष्ट्रवादी काँग्रेस  ३, काँग्रेस  २, शिवसेना  १

निवृत्त झालेले सदस्य

१. डॉ नीलम गोऱ्हे ( शिवसेना )१.  स्मिता वाघ, २. अरुण अडसड,३.पृथ्वीराज देशमुख ( भाजप) १. हेमंत टकले, २. आनंद ठाकूर, ३. किरण पावसकर ( राष्ट्रवादी काँग्रेस) १. हरिभाऊ राठोड, २. चंद्रकांत रघुवंशी (निवडणूक आधी राजीनामा दिला आहे) काँग्रेस पक्ष

सध्या विधानसभेत असणारे  पक्षीय बलाबल

भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस – ५४, काँग्रेस – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, समाजवादी पार्टी – २, एम आय एम – २, प्रहार जनशक्ती – २, मनसे – १, माकप – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, अपक्ष – १३

Previous articleगावाला जाण्यासाठी लागणारा अर्ज,नोडल अधिका-यांची नावे,मोबाईल नंबर पाहिजेत: तर करा फक्त एक क्लिक
Next articleगावी जायचे आहे.. आता  आपल्या जिल्ह्याची लिंक ओपन करा आणि माहिती भरा