राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची नारायण राणेंची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असून,कोरोनाचे रुग्ण आणि मृत्यू वाढत आहेत.अशा परिस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार ही परिस्थिती हाताळू शकत नाही.त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करतानाच,कोरोनामुळे राज्यावर गहिरे संकट असल्याने सरकारी रुग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावीत अशी मागणी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी केली आहे.

राज्यातील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा सदस्य नारायण राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.या भेटीनंतर माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी  सरकारवर प्रहार केला.सध्याच्या कोरोना संकटात जी काही मदत केलीय ती केंद्रातील सरकारने दिली आहे.राज्यात मदतीवरून जे राजकारण सुरू आहे ते समजण्यापलिकडचे आहे असे सांगत राज्यातील ठाकरे सरकारचा कसलाही अभ्यास नाही,प्रशासनातील अधिकाऱ्यांना कसे हाताळावे, त्यांचे प्राण कसे वाचवावे, पोलिसांना कसे संरक्षित ठेवावे याचा कसलाही अभ्यास सरकारला नाही. त्यामुळे राज्यात सध्या असणारा कारभार सुरु आहे असा टोलाही त्यांनी लगावला.राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ५० हजाराच्या पुढे गेला आहे तर हजाराच्या जवळपास मृत्यू झाले हे पाहता हे सरकार कोरोनाचा सामना करण्यासाठी अपयशी ठरले आहे. म्हणून राज्यपालांनी या सरकारचा विचार करावा तसेच आरोग्याच्या दृष्टीने,सेवा देण्याच्या दृष्टीने त्यांना सूचना केली. महानगरपालिका आणि राज्य सरकारची रूग्णालये लष्कराच्या ताब्यात द्यावी,तरच परिस्थिती सुधारु शकते, असे राणे म्हणाले.राज्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर होत आहे. रुग्णांच्या संख्येत वाढत आहे.राज्यपालांनी याकडे गांभीर्याने पाहावे आणि महाराष्ट्रात-मुंबईत होणारे मृत्यू थांबविण्यासाठी  प्रयत्न करावेत अशा त्यांनी सूचनाही केल्या. राज्य सरकारच्या आणि महानगरपालिका रुग्णालयांची अवस्था वाईट आहे असे सांगतानाच हे सरकार ही परिस्थिती हाताळू शकत नाही अशी टीकाही त्यांनी केली.

राज्य सरकार उपाययोजना करण्यात अपयशी ठरले आहे.हे लोकांचे प्राण वाचवू शकत नाही. या सरकारची कोरोनाचा सामना करण्याची क्षमता नसल्याने यांना नारळ द्यावा आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी राणे यांनी केली.मुख्यमंत्र्यांनी लोकांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, मात्र यांच्याकडून काहीच होताना दिसत नाही.सत्ताधाऱ्यांची स्थिती नाचता येईना अंगण वाकडं, अशी झाली असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.सध्या राज्यातील लोकांची उपासमार सुरु आहे,त्यांना रोजगार नाही, अन्न धान्य नाही, परीक्षा होत नाहीत.सर्व काही बंद आहे. त्यामुळे राज्यातील सरकार मुख्यमंत्री आणि मंत्री हे सरकार चालवायला,लोकांचा जीव वाचवायला आणि लोकांचा उदरनिर्वाह चालवायला सक्षम नाहीत असेही ते म्हणाले.

Previous articleउच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतांचा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दिलासा !
Next articleराज्यात कोरोनाबाधीत रुग्णांची संख्या ५२ हजार ६६७ पार