कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांसाठी सरकारने केली मोठी घोषणा

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट आल्यापासून रात्रदिवस सेवा बजावणा-या आणि राज्यातील एकूण ५७ पोलीसांना आपला जीव गमवावा लागला आहे.अशा पोलीसांच्या कुटुंबीयांना ठाकरे सरकारने मोठा धीर दिला आहे.कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या निवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानात राहता येईल,अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

कोरोना विषाणूंच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याच टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.या कोरोनाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील पोलीस आणि पोलीस अधिकारी रात्रदिवस सेवा बजावत आहेत.टाळेबंदीच्या काळात राज्यातील जिल्ह्याच्या सिमा बंद करण्यात आल्या आहेत.त्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदीसाठी चेकपोस्ट निर्माण करण्यात आल्या आहेत.त्यासाठीही मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.परराज्यातील मजूरांच्या घरवापसीमध्येही पोलीसांनी आपले कर्तव्य बजावले आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने   मुंबईतील ३६ पोलीस व १ अधिकारी अशा एकूण ३७, पुणे ३, सोलापूर शहर २, नाशिक ग्रामीण ३, ए.टी.एस. १, मुंबई रेल्वे २, ठाणे २ पोलीस व ठाणे ग्रामीण १ अधिकारी २, जळगाव ग्रामीण १,पालघर १, जालना  पोलीस अधिकारी १, उस्मानाबाद १ अशा  एकूण ५७ पोलिसांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. सध्या १०७ पोलीस अधिकारी व ९०८ पोलीस कोरोना  बाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या संकटात आपला जीव गमवावा लागलेल्या पोलीसांना सरकारच्या नियमाप्रमाणे विमा कवचाची नुकसान भरपाई मिळणार आहे.शिवाय कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना त्यांच्या निवासाची गैरसोय होवू नये म्हणून कोरोनाने जीव गमावलेल्या पोलिसांच्या निवृत्तीच्या अंतिम तारखेपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय अधिकृत निवासस्थानात राहता येईल अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.गृहमंत्री देशमुख यांनी ही माहिती ट्विट करून दिली आहे.राज्य सरकारच्या या निर्णयामुळे कोरोनामुळे  मृत्यू झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना मोठा धीर मिळाला आहे.सध्या राज्यातील ९९१ पोलीस कर्मचारी उपचार घेत आहेत तर सुमारे साडेतीन हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

Previous articleसलून,केशकर्तनालये आणि ब्युटी पार्लर्स सुरु करताना पाळावे लागतील “हे” नियम
Next articleव्यावसायिक अभ्याक्रमाच्या परिक्षा रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांकडे मागणी