चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावर फडणवीसांनी दिले हे उत्तर !

मुंबई नगरी टीम

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेसोबत सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे वक्तव्य केल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झालेल्या चर्चेनंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण देत शिवसेनेला आम्ही आणि आम्ही शिवसेनेला कोणताही प्रस्ताव दिलेला नसल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेनेसोबत आम्ही सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचे वक्तव्य करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खळबळ उडवून दिल्यानंतर राजकीय वर्तुळात  अनेक चर्चांना उधाण आले होते. त्यांनतर माध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ही शक्यता फेटाळून लावली.शिवसेनेला आम्ही कोणताही प्रस्ताव दिलेला नाही आणि शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.अयोध्येत राममंदिर भूमिपूजन होणारच आणि ते भव्य प्रमाणात व्हावे, ही कोट्यवधी रामभक्तांची इच्छा आहे. कोरोनाचा काळ असल्यामुळे जे जेथे आहेत, तेथून सहभागी होतील आणि नियम पाळून आनंदही साजरा करतील. अयोध्येतील राममंदिराचे ई-भूमिपूजन करण्याची मागणी एमआयएमने केली आहे आणि आता तीच मागणी मुख्यमंत्री का करतात, असा प्रश्नही फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.

जीएसटी कम्पेन्सेशनचे १९,२३३ कोटी रूपये केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला प्राप्त झाले आहेत. जे लोक वारंवार केंद्र सरकारवर आरोप करीत होते, त्यांनी आता केंद्र सरकारचे आभार मानले पाहिजे. पीएम केअर मधून सुद्धा सर्वाधिक मदत महाराष्ट्राला मिळाली आहे. मी त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानतो. आता मंत्र्यांनी सातत्याने केंद्र सरकारवर टीका करू नये असेही फडणवीस म्हणाले.

Previous articleपावसाळी अधिवेशन पुन्हा लांबणीवर ; आता ७ सप्टेंबरपासून घेण्याचा निर्णय
Next articleयंदा “दहीहंडी” उत्सव साजरा करू नका ; मनसे नेत्याचे आवाहन