छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही! काँग्रेस नेत्याचा टोला

मुंबई नगरी टीम

बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात हटवण्यात आल्यानंतर यावर आता महाराष्ट्रात राजकारण रंगताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराज फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही,असा टोला लगावला आहे.मनगुत्ती प्रकरणात महाराष्ट्रानं नाक खुपसू नये, असं वक्तव्य सतीश जारकीहोळी यांनी केले आहे.

बेळगावमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात भाष्य केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्राची संपत्ती नाही. शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत.कर्नाटकातील स्थानिक विषयांमध्ये महाराष्ट्राने नाक खुपसू नये,याचा नैतिक अधिकारही त्यांना नाही”,असं जारकीहोळी यांनी म्हटलं आहे. बेळगाव जिल्ह्यात स्थापन केलेल्या शिवाजी महाराजांराच्या मुर्तींमध्ये महाराष्ट्राचं कोणतंही योगदान नाही,अशी स्पष्टोक्ती जारकीहोळी यांनी केली आहे.

दरम्यान,बेळगावात घडलेल्या या प्रकरणानंतर शिवप्रेमींनी प्रचंड संताप आणि नाराजी व्यक्त केली. तर या प्रकरणावरुन महाराष्ट्रातील भाजप आणि शिवसेना नेत्यांमध्ये टीकांचं सत्र रंगलेलं दिसलं. याच मुद्द्यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला. ‘आता तरी, शिवभक्ती दाखवत शिवसेनेने काँग्रेसची साथ सोडावी’,असा सल्ला भातखळकर यांनी दिला. तर आज शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून भाजपवर टीका करण्यात आली आहे. मात्र आता काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनीच महाराष्ट्राला या प्रकरणात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला दिला आहे.

Previous articleकॅबिनेट मंत्री शंकरराव गडाख यांचा शिवसेनेत प्रवेश
Next articleमहाविद्यालयांनी डेव्हलपमेंट शुल्क आकारु नये, रोहित पवारांचं आवाहन