मंत्री मुश्रीफ यांची तत्परता;कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाखांची मदत

मुंबई नगरी टीम

मुंबई : कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याला विम्याचे कवच मिळावे यासाठीचा प्रस्ताव तातडीने एका दिवसात मंजूर करीत या मृत अधिका-याच्या वारसास ५० लाखाच्या विमा कवचाची रक्कम अदा करण्याचा निर्णय राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतल्याने सध्याच्या संकटाच्या काळात तातडीने संबंधित अधिका-याच्या कुटुंबीयांना मोठा हातभार लागला आहे.

परभणी जिल्ह्यातील सुपा या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी रामदास आम्ले हे ग्रामस्थांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी कर्तव्य बजावत असताना त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला.उपचार घेत असतानाच 3 ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला.याअनुषंगाने संबंधीत मृताच्या वारसास विमा कवच रक्कम मिळण्याबाबत परभणी जिल्हा परिषदेने राज्य शासनास १२ ऑगस्ट रोजी प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावास तातडीने एका दिवसात मंजुरी देऊन मृत ग्रामविकास अधिकारी यांच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितलेकोरोना संकटकाळात ग्रामीण भागातील कर्मचारी जीवावर उदार होऊन आपले कर्तव्य बजावत आहेत. ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला आहे. हा प्रसार रोखण्यासाठी गावपातळीवरील कर्मचारी कोरोना योद्धा बनून काम करीत आहेत. या पार्श्वभूमीवर गावपातळीवर काम करणारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कार्यकर्ती, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी, कामगार यांना ३० सप्टेंबर पर्यंत ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुषंगाने कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील संबंधीत ग्रामविकास अधिकारी यांच्या वारसांना तातडीने विमा कवच रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेकडून प्राप्त प्रस्तावानुसार मृत ग्रामविकास अधिकारी यांचे वारस, त्यांची पत्नी रंजना आम्ले यांना विमा कवच रक्कम तातडीने स्वातंत्र्यदिनी परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.

Previous articleराज्यातील जिम तत्काळ सुरू करा! देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Next articleदणका : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीच्या चौकशीचे आदेश