मुंबई पोलिसांवर सरकारचा दबाव : आठवलेंनी घेतली सुशांतच्या कुटुंबियांची भेट

मुंबई नगरी टीम

मुंबई : केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या कुटुंबियांची हरयाणातील फरीदाबाद येथे जाऊन भेट घेतली. सुशांतच्या मृत्यूची चौकशी होणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांवर सरकारचा दबाव असू शकतो, त्यामुळे तपास तोकडा पडला असल्याचे आठवले यांनी म्हटले. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी ही भूमिका मांडली.

रामदास आठवले यांनी सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. आपल्याला नक्कीच न्याय मिळेल,असा विश्वास आठवलेंनी सुशांतच्या वडिलांना दिला. त्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले, “सुशांतच्या मृत्यूची चौकशी होणे आवश्यक आहे. मुंबई पोलिसांवर सरकारचा दबाव असण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांचा तपास अगदी जबरदस्त असतो.मात्र सरकारच्या दबावामुळे पोलिसांचा तपास तोकडा पडला.त्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी करण्यात आली”, असे आठवले म्हणाले. तसेच ही आत्महत्या नाही हत्या असल्याचा संशय मी या पूर्वीच व्यक्त केला होता. आता सीबीआय मार्फत याची चौकशी केली जात आहे. आपल्या दुःखात आम्ही सहभागी असून संपूर्ण देश आपल्या सोबत आहे, असे आश्वासनही आठवलेंनी सुशांतच्या कुटुंबियांना दिले.

सुशांतच्या मृत्यूचे गुढ दिवसेंदिवस वाढत असून रोज नवे खुलासे होत आहेत.सध्या या प्रकरणात ड्रग्ज कनेक्शन असल्याचे वृत्त देखील समोर आले आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात या गोष्टी उघड का झाल्या नाहीत, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, सुशांतने आत्महत्या केली की त्याची हत्या झाली याचा तपास सध्या सीबीआय करत आहे. त्यामुळे संशयाच्या घे-यात असणारे लोक सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत.

Previous articleसुशांतसिंग राजपूत प्रकरणाशी भाजपाचे कनेक्शन काय ? काँग्रेसचा सवाल
Next articleसरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ