अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत येत्या दोन दिवसांत निर्णय होणार !

मुंबई नगरी टीम

मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षांसंदर्भात चर्चा करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज राज्यपाल भगसिंह कोश्यारी यांची भेट घेतली.परीक्षांच्या आयोजनासंदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.परीक्षा कधी व कशा पद्धतीने घेतल्या जातील याचा निर्णय येत्या दोन दिवसांत होण्याची शक्यता आहे.राज्यपालांच्या भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना उदय सामंत बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, “विद्यार्थ्यांना कमीत कमी त्रास होईल,अशा पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी राज्यपालांनी देखील सकारात्मक भूमिका दाखवली आहे.विद्यार्थ्यांना फार त्रास न होता परीक्षा घेतल्या जाव्यात, असे राज्यपालांचे देखील मत आहे”, असे उदय सामंत म्हणाले. प्रत्येक कुलगुरूंनी मांडलेल्या भूमिकेविषयी राज्यपालांना यावेळी माहिती देण्यात आली आहे.त्यामुळे एकंदर आजची चर्चा सकारात्मक झाली असल्याचे उदय सामंत म्हणाले.

यासह आज मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्या नेतृत्वाखालील समितीची आज बैठक पार पडणार आहे.शिवाय आपत्कालीन व्यवस्थापन समितीची देखील आज बैठक पार पडणार आहे. तर उद्या ३ सप्टेंबरला कुलगुरू व राज्यपाल यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडणार आहे. या बैठकीत उदय सामंत उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटाही सहभागी होणार आहेत.त्यामुळे उद्याच्या राज्यपालांच्या बैठकीनंतर परीक्षांसंदर्भात अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Previous articleकाही श्रीमंत लोकांमुळे आयसीयू बेडची कमतरता : राजेश टोपेंची प्रतिक्रिया
Next articleमहाराष्ट्रात उपचार घेत असलेल्यांमध्ये ८० टक्के हे लक्षणे नसलेले रूग्ण