शरद पवारांना लक्ष्य करणा-या कंगनाचा जितेंद्र आव्हाडांनी घेतला समाचार

मुंबई नगरी टीम

मुंबई : कालपर्यंत शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांविरोधात गळा काढणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील भाष्य केले आहे.कंगनाच्या खार येथील एका फ्लॅटला २०१८ साली मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावली होती.याबाबत तिने ट्वीट करताना शरद पवार यांच्याकडे बोट दाखवले आहे. तर कंगनाच्या या ट्वीटवरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता खरपूस समाचार घेतला आहे.

कंगनाने आपल्या पहिल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की “महाराष्ट्राचे पेड सोर्स चुकीची माहिती पसरवत आहेत.बीएसमसीने कालपर्यंत मला कधीही नोटीस बजावली नाही.खरे तर नूतनीकरणासाठी मी सर्व कागदपत्रे मनपाला दिली होती. मनपासमोर किमान धैर्याने उभे राहण्याची ताकद माझ्यात आहे. आता खोटे का बोलत आहेत ?”, असे ती म्हणाली. तर आपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये तिने शरद पवार यांच्याकडे उत्तर मागितले आहे.”हा केवळ माझाच नाही तर संपूर्ण इमारतीचा प्रश्न होता,फक्त माझ्या फ्लॅटचा मुद्दा नाही. त्यासाठी बांधकाम व्यावसायिकाने सामोरे जाण्याची गरज आहे. ही इमारत शरद पवारांची आहे.त्यांच्या भागीदाराकडून आम्ही हा फ्लॅट खरेदी केला.त्यामुळे याकरता उत्तर देण्यासाठी ते बांधील आहेत”, असे कंगना म्हणाली.यावर जितेंद्र आव्हाड यांनी कंगनाचे नाव न घेता तिला प्रत्युत्तर दिले आहे. “शरद पवारांनी महाराष्ट्र उभा केला, बांधला. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. पण जिला महाराष्ट्राबाबत काहीच माहित नाही ती म्हणते त्यांनी बिल्डिंग बांधली”, असे ट्वीट करत आव्हाडांनी हॅशटॅग करीत मानसिक रोगी असे म्हटले आहे.

अनधिकृत बांधकामामुळे मनपाने कंगनाच्या वांद्रे येथील कार्यालयावर कारवाई केल्यानंतर ती अधिकच आक्रमक झालेली दिसत आहे. तर बुधवारी मुंबईत येताच क्षणी तिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केला. तर आता थेट शरद पवारांना तिने उत्तर देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, काल झालेल्या एका पत्रकार परिषदेत शरद पवारांनी कंगनाचे नाव न घेता तिच्या व्यक्तव्याकडे लक्ष न देण्याचा सल्ला दिला होता.

Previous articleवाचा : मराठा आरक्षणावर न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर काय म्हणाले अशोक चव्हाण
Next articleकंगना प्रकरणावरून राज्यपालांची सरकारवर नाराजी,केंद्राकडे अहवाल देणार