मुंबई नगरी टीम
मुंबई : कोविड केअर सेंटरच्या कामात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत भाजपने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा साधला होता. तर आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी वरळी भागातील एसआरए सोसायटीतील फ्लॅट बळकावल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मात्र सोमय्या यांच्या या आरोपांचे खंडन महापौरांकडून करण्यात आले असून त्यांनी थेट आव्हानच दिले आहे.
किरीट सोमय्या यांचे हे आरोप खोटे आहेत असून,२००८ ला मी तिथे भाडेतत्वार राहायला आली आहे. माझे दरवर्षीचे भाडे त्या मालकाला दिले आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. किश कॉर्पोरेट ऑफिस आमचे नसून ते भाड्यावर आहे. त्यामुळे काही लाटण्याचा प्रश्नच नाही. किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात पुरावे द्यावे. आरोप सिद्ध झाले तर मी शिक्षा भोगेन, असे खुले आव्हान किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर आरोप करत यासंदर्भात ट्वीट केले आहे. तसेच काही कागदपत्रे देखील त्यांनी जोडली आहेत. “वरळीतील गोमाता एसआरए सोसायटीच्या इमारत क्रं. २ मधील रहिवासी फ्लॅट आणि इमारत क्रं १ मधील कार्यालय (केआयएस सर्विसेस) हे महापौर किशोरी पेडणेकर यांनी बळकावले आहे. हा फ्लॅट झोपडपट्टी पुनर्वसनाअंतर्गत एका व्यक्तील आणि ऑफिस गोमाता एसआरए हाऊसिंग सोसायटीला देण्यात आले आहे. हा एसआरए प्रकल्प मुंबई महानगरपालिकेचा आहे”.
महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर कोविड केअर सेंटरप्रकरणी मनसेने आणि भाजपने आरोप केले होते. मात्र या आरोपांत तथ्य नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले होते. तर आता पुन्हा किरीट सोमय्या यांनी नवा आरोप करत महापौरांच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, अभिनेत्री कंगना राणावत हिच्या अनधिकृत बांधकामावर मनपाने कारवाई केली होती. त्यानंतर कंगनाच्या समर्थनात असलेल्या भाजपने आता सत्ताधारी पक्षातील अनधिकृत बांधकामांचा शोध घेण्यास सुरूवात केली आहे. शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनीही म्हडाची जागा बळकावून अनधिकृत कार्यालय उभारले असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.