पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवा; यावर गृहमंत्री काय म्हणाले

मुंबई नगरी टीम

मुंबई : मराठा आरक्षणाच्या स्थगितीनंतर राज्यात ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत अशातच राज्य सरकारने १२ हजार ५२८ पोलिसांची भरती प्रक्रिया राबवली जणार असल्याची घोषणा केल्याने मराठा समाजाकडून आणखी नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पोलीस भरतीत मराठा समाजासाठी १३ टक्के जागा रिक्त ठेवा,अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केली आहे. यावर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

विनायक मेटे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत ही मागणी केली आहे. विनायक यांनी या संदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. “मराठा आरक्षणाच्या माध्यमातून जेवढ्या तेरा टक्के जागा आमच्या वाटेला येतात. त्या जागा रिक्त ठेवा. त्याबद्दलचा निर्णय मंत्रिमंडळाने घ्या आणि सर्वोच्च न्यायालयाची परवानगी घेऊन त्या जागा भरून टाका. मराठा समाजाच्या मुला-मुलींना त्या भरतीमध्ये सामावून घेतले. तरच मराठा समाजाबद्दल हे आघाडी सरकार सकारात्मक आहे, असे म्हणता येईल. अन्यथा सगळी संतापाची प्रतिक्रिया रस्त्यावर बघायला मिळाल्या शिवाय राहणार नाही. मग त्याचा दोष समाजावर न देता तो सरकारचा असेल”, असा इशारा विनायक मेटे यांनी दिला आहे.

अनिल देशमुख यांनी देखील यावर प्रतिक्रिया देतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. “मराठा आरक्षण टिकवण्याचा राज्य शासनाचा सर्वपरीने प्रयत्न चालू आहे. दरम्यान,  साडे बारा हजार पोलीस भरती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पण ही पोलीस भरती करत असताना मराठा समाजाच्या १३ टक्के जागा बाजूला काढून ही बाब कायद्यानुसार तपासू. मराठा समाजाला योग्य न्याय देण्याचा प्रयत्न राज्य शासनाचा राहणार आहे”, असे अनिल देशमुख म्हणाले.

Previous articleविद्यार्थ्यांना दिलासा : पदवी प्रमाणपत्रावर कोविड-१९ चा उल्लेख नसणार
Next articleमुंबईत चार पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास कारवाई