मुंबईत चार पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र आल्यास कारवाई

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीत राज्य सरकार एकिकडे शिथीलता देत जीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न करीत असले  तरी गेल्या काही दिवसात मुंबईतील कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असल्याने मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्यात आले असून,आज मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या ग्रामीण भागात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे.मुंबईतील जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच गेल्या काही दिवसांत शहर आणि उपनगरात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र असल्याने मुंबई पोलिसांनी मुंबईत पुन्हा एकदा जमावबंदीचे १४४ कलम लागू केले आहे.याची अंमलबजावणी आज मध्यरात्रीपासून होणार असून, येत्या ३० सप्टेंबरपर्यंत जमावबंदी लागू राहणार आहे. चार किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्र दिसल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.मिशन बिगेन अंतर्गत देण्यात आलेल्या आधीच्या आदेशात सूट देण्यात आलेल्या सर्व गोष्टी सुरु राहणार आहेत.मुंबई पोलिसांचे हे आदेश नित्यक्रमाचा भाग असून अनलॉक गाइडलाइन्समध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.कोणताही नवा लॉकडाउन जाहीर करण्यात आलेला नाही असेही  स्पष्ट करण्यात आले आहे.

Previous articleपोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी राखीव ठेवा; यावर गृहमंत्री काय म्हणाले
Next articleवाचा : अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात काय म्हणाले..मंत्री उदय सामंत