मी कायम लोकांमध्ये राहूनच कार्य करीत आलोय;कोरोनामुक्त होताच उदय सामंत जनतेच्या सेवेत

मुंबई नगरी टीम

मुंबई : कोरोनावर यशस्वीपणे मात करून बाहेर आल्यानंतर आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज आपला जनता दरबार घेतला. या उपक्रमास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदविला.

कोरोनामुक्त झाल्यानंतर आज पहिल्यांदाच शिवसेना राज्य संपर्क कार्यालय शिवालय येथे सामंत यांनी आपला ‘जनता दरबार’ घेतला. यावेळी, शिवसैनिक, विद्यार्थी, शिक्षक, नागरिक, पालक, लोककला कलावंत, अधिकारी, विद्यार्थी संघटना व ग्रंथालय कर्मचारी यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांनी त्या तत्काळ सोडविण्याच्या सूचना संबंधित विभागास केल्या.मी कायम लोकांमध्ये राहूनच कार्य करीत आलोय. नागरिकांच्या सदिच्छा आणि आशीर्वादाने पुन्हा एकदा नव्या जोमाने मी आज जनता दरबारच्या माध्यमातून कामाला सुरूवात करतोय. या उपक्रमास नागरिकांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात सहभाग लाभत आहे. याचा मनस्वी आंनद आहे. लोकांत जाणे आणि त्यांच्या अडचणी सोडविणे हेच लोकप्रतिनिधी म्हणून माझे पहिले प्राधान्यक्रम आहे. लोकं ही माझ्यासाठी ऊर्जास्रोत आहेत असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

आजच्या या जनता दरबार मध्ये ३०० ते ४०० नागरिकांनी सहभाग नोंदविला होता. या माध्यमातून नागरिकांच्या अडचणी तत्काळ सुटत असल्याकारणाने त्यांच्या मनामध्ये समाधानाची भावना असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी यावेळी व्यक्त केली.

Previous articleभाजपच्या राज्यात दलित,अल्पसंख्याक आणि महिलांवरील अत्याचारात वाढ
Next articleबाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेला हरताळ फासण्याचे काम संजय राऊतांनी केले