मायक्रो फायनान्स कंपन्यांना चाप लावा अन्यथा मनसैनिक कारवाई करतील

मुंबई नगरी टीम

मुंबई : जिमचालक,मुंबईचे डबेवाले,बीज बिल ग्राहक,कोळी महिला,पुजारी, डॉक्टरांचे प्रश्न तडीस नेल्यानंतर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आपला मोर्चा मायक्रो फायनान्स कंपन्यांकडे वळविला आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणा-या दंडेलशाहीकडे लक्ष वेधले आहे.सरकार म्हणून आता जागे व्हा आणि पोलीस प्रशासनाच्या मार्फत ह्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अरेरावीला चाप बसवा आणि हे जर सरकार म्हणून तुमच्याकडून होणार नसेल तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याकडे लक्ष वेधले आहे.राज ठाकरे आपल्या पत्रात म्हणतात,महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय करणं आणि त्याचा विस्तार करणं ही नित्याची बाब आहे,आणि असं कर्ज घेणाऱ्या माता-भगिनींनी कर्जाचा हप्ता चुकवण्यात कधीच दिरंगाई केलेली नाही. प्रसंगी पोटाला चिमटा काढला असेल पण हप्ते वेळेत भरले आहेत. पण मार्च २०२० पासून कोरोनामुळे केलेलं लॉकडाऊन आणि त्यातून निर्माण झालेलं आर्थिक आरिष्ट ह्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील महिला बचत गटांचे व्यवसाय जवळपास ठप्प आहेत. त्यामुळे अर्थातच मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले.पण ह्या परिस्थितीचा कसलाही विचार न करता मायक्रो फायनान्स कंपन्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात दंडेलशाही सुरु केली आहे.

कर्जदाराच्या घरी जाऊन दमदाटी करणे त्याचा चारचौघांच्यात अपमान करणे असले प्रकार सर्रास सुरु आहेत. ह्या विषयीच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या दंडेलशाहीवर सरकारने अंकुश ठेवायला हवा, कर्जदाराच्या घरी जाऊन त्याची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा अधिकार ह्या कंपन्यांना कोणी दिला? हा विषय गंभीर आहे आणि हे जर असंच सुरु राहिलं तर लक्षात ठेवा ह्याचे मानसिक आणि सामाजिक परिणाम गंभीर असतील. म्हणून सरकार म्हणून आता जागे व्हा आणि पोलीस प्रशासनाच्या मार्फत ह्या मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या अरेरावीला चाप बसवा. आणि हे जर सरकार म्हणून तुमच्याकडून होणार नसेल तर माझ्या महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या पद्धतीने कारवाई करावी लागेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. तसंच पूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थाच गेले ६ महिने ठप्प आहे आणि अजूनही अर्थव्यवस्थेला उभारी येण्याची कोणतीही चिन्ह नाहीत त्यामुळे ह्या माता-भगिनी कर्जाचे हप्ते भरू शकतील ह्याची शक्यता नाही, त्यामुळे ह्या महिलांच कर्ज माफ करण्यासाठीही सरकारने पाऊलं उचलायला हवीत अशी मागणी राज ठाकरे यांनी केली.

ह्यातील अजून एक महत्वाचा मुद्दा म्हणजे मायक्रो फायनान्स कंपन्यांनी बचत गटाच्या महिलांकडून विमा उतरवतो हे सांगून त्या विम्याचा हप्ता गोळा केला आहे पण आज जेंव्हा व्यवसाय ठप्प आहे आणि कर्जाचे हप्ते देणं ह्या महिलांना शक्य नाही अशा वेळेस जेंव्हा ह्या महिला विम्याच्या पॉलिसीची मागणी करत आहेत तेंव्हा मायक्रो फायनान्स कंपन्या विम्याचे कागदपत्रं देत नाहीयेत. ह्यात ह्या माता-भगिनींनी जरी विम्याची रक्कम अदा केली असली तरी विमाच उतरवला गेला नाहीये अशी शंका येत आहे. त्यामुळे ह्या महिलांना विम्याचे कागदपत्रं तर मिळायलाच हवेत पण त्यांना त्यांच्या विमा कवचाचा लाभ देखील मिळायलाच हवा  असेही राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे.

Previous articleलोकशाही विरोधात भारतीय जनता पक्षाचा कट;भाजप नवदहशतवाद !
Next articleशरद पवारांची भेट घेण्यासाठी मला कोणाच्या परवानगीची गरज नाही