मुंबईत १६ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन रोजगार मेळावा; व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे मुलाखती

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचेमार्फत ७ ऑक्टोबर ते १६ ऑक्टोबर दरम्यान ऑनलाईन पध्दतीने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी मेळावा आयोजन केला असून यामधील मुलाखती व्हीडिओ कॉन्फरन्स (स्काईप, व्हॉटस्ॲप इत्यादी) द्वारे घेण्यात येणार आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील काही दिवसांपासून अनेक आस्थापना, व्यवसाय व उद्योग बंद होते. आता शासनाने काही अटी व शर्तीच्या अधिन राहून कंपन्या, औद्योगिक आस्थापना, व्यवसाय, उद्योग सुरु करण्यास मान्यता दिली आहे. मात्र काही औद्योगिक आस्थापनांना मनुष्यबळाची आणि स्थानिक बेरोजगार उमेदवारांना कामाची आवश्यकता असल्याचे जाणवत आहे. यासाठी नियोक्ते आणि रोजगार इच्छुक उमेदवारांकरिता हा ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केला आहे.

या मेळाव्यात रोजगार देणाऱ्या नामांकित एका कंपनीची ४० रिक्त पदे www.rojgar.mahaswayam.gov.inया वेबपोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात आली आहेत. यासाठी या वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्तपदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणाऱ्या किंवा ऑनलाईन अर्ज केलेल्या उमेदवारांच्या व्हिडीओ कॉन्फरन्स (स्काईप, व्हॉटस्ॲप इत्यादी) व्दारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. या संधीचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घेण्यासाठी या वेबपोर्टलला लॉगइन करावे.नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्रॉईड मोबाईलधारकांनी प्ले स्टोअरमधून mahaswayam ॲप मोफत डाऊनलोड करुन नोंदणी करावी. तसेच लॉगइन करुन शैक्षणिक पात्रतेनुसार उपलब्ध रिक्तपदांसाठी अर्ज करावा. महास्वयंम वेबपोर्टलवर रोजगार संधीचा लाभ घेण्याकरीता नोकरी इच्छूक उमेदवारांनी त्यांचे प्रोफाईल हे ई-मेल आयडी तसेच मोबाईल क्रमांकासह अद्ययावत करावेत. तसेच आपली नोंदणी आधार क्रमांकास संलग्न करावी याबाबत काही अडचण आल्यास सहाय्यासाठी कार्यालयाच्या ०२२ – २२६२६३०३ या दुरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा. या मेळाव्याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त छाया कुबल यांनी केले आहे.

Previous articleसातारच्या गादीचा अवमान सहन करणार नाही :शंभूराज देसाई 
Next articleकोरोनामुळे होणारा मृत्यूदर एक टक्क्यावर आणण्याचे उद्दिष्ट