मुंबई नगरी टीम
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या १२ जागांवरील नियुक्त्या रखडल्या होत्या.मात्र उद्या बुधवारी होणा-या मंत्रिमंडळ बैठकीत या १२ सदस्यांच्या नावाचा प्रस्ताव येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीबाबत मागच्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव येणार अशी चर्चा सुरू होती.परंतू काही कारणास्तव प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला.त्यामुळे आता उद्या बुधवारी याचा मुहूर्त निघणार असल्याची माहिती आहे.महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्याने दाखल झालेले एकनाथ खडसे यांचे नाव या यादीत असणार का ? अशी चर्चाही सुरू झाली आहे.
यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक पार पडली होती.मात्र हा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला.बुधवारी सदस्यांच्या १२ नावांना मंत्रिमंडळाची मंजूरी दिली जाणार असून ती यादी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे. त्यामुळे यावर राज्यपाल आपली सहमती दर्शवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांत सत्ताधारी विशेषकरून शिवसेना आणि राज्यपाल यांच्यात शाब्दिक वाद रंगलेला पाहायला मिळाला होता.त्यामुळे १२ सदस्यांच्या नावांना मंजूरी देण्याबाबत राज्यापाल काय निर्णय घेणार हे पाहावे लागेल.
दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.त्यामुळे राष्ट्रवादीत त्यांना मोठी जबाबदारी दिली जाणार अशी चर्चा होती.परंतू खडसेंनी आपल्याकडे कोणतीही अपेक्षा केलेली नाही. पक्षात कोणतेही बदल केले जाणार नाही,असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्ट केले होते. तर आता राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नावांचा प्रस्ताव दिला जाणार असून त्यात राष्ट्रवादी कडून एकनाख खडसेंचे नाव असणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी शिवसेनेकडून माजी आमदार सुनिल शिंदे,सचिन अहिर, शिवसेना सचि मिलिंद नार्वेकर, युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल, माजी मंत्री अर्जुन खोतकर, यांच्या नावाची तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री एकनाथ खडसे,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, गायक आनंद शिंदे,धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर,आदिती नलावडे,शिवाजी गर्जे,काँग्रेसकडून प्रवक्ते सचिन सावंत,युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे,मोहन जोशी आणि माजी मंत्री नसीम खान यांच्या नावाची चर्चा आहे.