मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात चर्चा;विधानपरिषदेसाठी १२ जणांची यादी सोमवारी राज्यपालांना देणार

मुंबई नगरी टीम

मुंबई :गेल्या चार महिन्यापासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील राज्यपाल नामनिर्देशित १२ जागावर कोणाला संधी द्यायची यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने प्रत्येकी चार जणांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सोपविली असून,शिवसेनेसह १२ जणांच्या नावाची यादी राज्यपालांना सोमवारी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.दरम्यान काल उशीरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात बैठक झाली असून,या मध्ये राज्यपाल नियुक्त सदस्य व अतिवृष्टीग्रस्तांच्या प्रश्नावर चर्चा झाल्याचे समजते.

राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या १२ रिक्त जागांवर काँग्रेस,राष्ट्रवादी आणि शिवसनेनेकडून प्रत्येकी चार जणांच्या नावाची शिफारस करण्यात आली असून,ही नावे मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.राज्यपाल आणि राज्य सरकारमधील संबंध पाहता निकषात बसतील अशांच्या नावांना पसंती देण्याचे धोरण या पक्षांनी अवलंबले असल्याचे सांगण्यात येते.त्यामुळेच शिवसेनेने अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.या प्रस्तावाला मातोंडकर यांनी होकार दिला असल्याने उर्मिला मातोंडकर शिवसेनेकडून आमदार होणार हे निश्चित झाले आहे.शिवसेनेकडून दुस-या जागेसाठी शिवसेना नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांना संधी दिली जाणार आहे.तर अजून दोन जणांच्या नावांवर उद्या शिक्कामोर्तब केला जाईल.या १२ नावांची यादी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली जाणार आहे.

गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विधानपरिषदेच्या जागांसाठी १२ उमेदवारांच्या नावांना मान्यता देण्यात आली आहे.राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून कोणाकोणाची वर्णी लागणार याबाबत अनेक तर्क लावले जात असतानाच दुसरीकडे याबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात येत आहे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल उशीरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.मुख्यमंत्री आणि पवार यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली.या बैठकीतील चर्चेचा अधिकृत तपशील हाती लागला नसला तरी राज्यपाल नियुक्त सदस्य व अतिवृष्टीग्रस्तांच्या प्रश्नावर बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात १२ जणांची नावे सोमवारी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहे. यामध्ये शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर आणि आदेश बांदेकर ही दोन नावे निश्चित करण्यात आली आहेत तर राष्ट्रवादीकडून माजी मंत्री एकनाथ खडसे यांना संधी दिली जाणार आहे.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनाही राष्ट्रवादीकडून संधी मिळण्याची शक्यता आहे.राष्ट्रवादीकडून गायक आनंद शिंदे यांच्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

राष्ट्रवादीकडून चौथ्या जागेवर प्रशासकीय कामाचा अनुभव असणारे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आणि राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांना संधी दिली जावू शकते.काँग्रेसकडून सचिन सांवत,रजनी पाटील,अनिरूद्ध वनकर,यांच्या नावाची चर्चा असली तरी काँग्रेस,राष्ट्रवादीने आपल्या नावांची यादी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे सोपविली आहे.ही १२ नावे सध्या गुलदस्त्यात असली तरी,राज्यपाल नियुक्त सदस्य हा कला,साहित्य,समाजसेवा आणि सहकार या क्षेत्राशी निगडीत असावा असा नियम आहे.महाविकास आघाडीकडून देण्यात येणारी नावे या निकषात बसतात का किंवा या नावांवर राज्यपालांकडून कोणतीही हरकत घेतली जाऊ नये, यासाठी तिन्ही पक्षांनी खबरदारी घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे.

Previous articleजमीन खरेदी व्यवहाराची लोकायुक्तांमार्फत चौकशी करण्याची सोमैय्यांची राज्यपालांकडे मागणी
Next articleकांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक क्षमता वाढवून देण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी