मुंबई नगरी टीम
मुंबई : विद्यार्थी-पालक समन्वय समितीने आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या ‘कृष्णकुंज’ या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.फी वाढ व रखडलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया या संदर्भात समितीने राज ठाकरेंची भेट घेतली. दरम्यान, राज ठाकरे यांनी समितीने मांडलेले मुद्दे ऐकून घेतल्यानंतर थेट शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना फोन केला. यावेळी वर्षा गायकवाड यांनी सायंकाळी याबाबत बैठक असल्याचे सांगून उद्यापर्यंत कळवतो, असे आश्वासन राज ठाकरेंना दिले
गेल्या दोन महिन्यांपासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडलेली आहे. कॉलेज कधी सुरू होणार? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचा प्रश्न असून काहींची अॅडमिशन्स देखील झाली आहेत. यासह फी वाढीचा मुद्दा देखील पालकांनी यावेळी मांडला. त्यामुळे या सगळ्यातून मार्ग कसा काढता येईल, या अनुषंगाने विद्यार्थी-पालक समन्वय समितीने आज राज ठाकरेंना साद घातली. समितीने मांडलेले सर्व मुद्दे ऐकल्यावर राज ठाकरेंनी त्याच क्षणी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना फोन लावत सदर विषय मांडला. याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही राज ठाकरे यांनी म्हटले. याबाबत शिक्षण अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली असून लवकर यावर निर्णय घेऊ, असे वर्षा गायकवाड यांनी राज ठाकरेंना सांगितले.
यावेळी कोचिंग क्लासेसचे मालक आणि शिक्षकांच्या शिष्टमंडळाने देखील राज ठाकरे यांची भेट घेतली. राज्यात इतर उद्योगधंदे सुरू होत असतानाच कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा निर्णय अद्यापही झालेला नाही. त्यामुळे कोचिंग क्लासेस मालकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर कोचिंग क्लासेस मालक आणि शिक्षकांनी राज ठाकरेंची भेट घेत त्यांच्या मागण्या सरकारपुढे मांडण्याची विनंती केली आहे. याआधी जिम चालक, डबेवाले, कोळी महिला आदींनी राज ठाकरेंची भेट घेत आपल्या समस्या मांडल्या होत्या. त्यानंतर मनसेने सरकारपुढे त्यांच्या मागण्या लावून धरल्या होत्या. तर आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.