मराठा आरक्षण प्रश्नी वेळ पडल्यास रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालेन

मुंबई नगरी टीम

सातारा : मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी मराठा समाज आक्रमक झालेला आहे. यासाठी मराठा नेत्यांच्या नेतृत्वात आंदोलने केली जात आहेत. असे असताना मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ पडल्यास मी रथीमहारथींना साष्टांग नमस्कार घालायला तयार आहे,असे विधान भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे. वेळ आल्यावर मराठा आरक्षणावर आपण जाहिरपणे बोलू. मात्र राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका मांडली पाहिजे, असे मत उदयनराजेंनी व्यक्त केले आहे. उदयनराजे भोसले यांचे हे विधान अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी असल्याचे बोलले जात आहे.

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी आज साताऱ्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे याचा पुनरुच्चार केला. तसेच योग्यवेळी आपण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलू, असेही त्यांनी सांगितले. राज्यातील वडीलधाऱ्या माणसांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडावी, असे आवाहन उदयनराजे भोसले यांनी केले आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी मराठा आरक्षण प्रश्नावर लक्ष घालावे, अशी मागणी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबा पाटील यांनी केली होती.शरद पवार यांच्या नेतृत्वात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्याचप्रमाणे मराठा आरक्षणाचा प्रश्नही मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली होती. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. तर दुसरीकडे विरोधी पक्षातील खासदर उदयनराजे भोसले यांनी देखील आता शरद पवारांनी याकडे लक्ष घालावे, असे सूचित केले आहे.

Previous articleआंदोलनाचा वणवा केंद्र सरकारला नेस्तनाबूत करेल! बाळासाहेब थोरात
Next articleवाचा : आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय